मुंबई - आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक व विशेष कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांचे घर व कार्यालयावर सक्तवसूली संचलनालयाने (ईडी) आज छापेमारी केली. कर्ज गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई व औरंगाबाद 12 ठिकाणांवर रात्री उशीरापर्यंत शोध मोहिम राबवण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे. त्यात कोचर यांचे पती व न्यू पॉवररिन्यूवेबलचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कोचर तसेच व्हिडिओकोन समुहाचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. एन. धूत यांच्या संबंधीत ठिकाणांचाही समावेश आहे. याप्रकरणी सर्व आरोपींविरोधात लुक आऊट सर्कुलर जारी करण्यात आले होते. याप्रकरणी सकाळपासूनच ईडीने मुंबई व औरंगाबाद येथील 12 ठिकाणांवर छापे टाकून शोध मोहिम राबवली. गुन्ह्यांसंबीत पुरावे गोळा करण्यासाठी ही शोध मोहिम राबवण्यात आली. कोचर या आयसीआयसीआय बँकेच्या कार्यकारी संचालक आणि सीईओ असताना त्यांनी व्हिडीओकॉन कंपनीला पदाचा गैरवापर करत 3250 कोटींचं कर्ज दिले. हे कर्ज देताना कोचर यांनी व्यक्तिगत हित बघितलं आणि त्याचा फायदा घेतला असा त्यांच्यावर आरोप होता. उद्योगपती धूत व चंदा कोचर यांचे पती दिपक कोचर यांनी एकत्र येऊन न्यू पॉवर रिन्यूवेबल ही कंपनी स्थापन केली होती. त्या कंपनीच्या नावावर 64 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले होते. त्याशिवाय व्हीडीओकॉन ग्रुपच्या पाच कंपन्यांच्या नावावर तीन हजार 250 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले होते. त्यातील 86 टक्के रक्कम म्हणजेच दोन हजार 810 कोटी रुपये देण्यात आलेले नाही. त्यानंतर 2017 मध्ये या कर्जाला बुडीत घोषित करण्यात आले होते.