नागपुरात चंद्रपूरच्या मद्यतस्करांची टोळी जेरबंद : विदेशी मद्याचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 09:34 PM2020-02-27T21:34:06+5:302020-02-27T23:58:05+5:30
विदेशी दारूची मोठी खेप घेऊन चंद्रपूरकडे निघालेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील मद्यतस्करांची टोळी गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री जेरबंद केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदेशी दारूची मोठी खेप घेऊन चंद्रपूरकडे निघालेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील मद्यतस्करांची टोळी गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री जेरबंद केली. या टोळीत सात मद्यतस्करांचा समावेश असून, पोलिसांनी त्यांच्याकडून विदेशी मद्याच्या तब्बल ८६३ बाटल्या जप्त केल्या.
चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी झाल्यापासून नागपूर-चंद्रपुरातील मद्यतस्कर मिळेल त्या मार्गाने दारूची तस्करी करतात. त्यासाठी अल्पवयीन मुलांपासून तर महिला मजुरांपर्यंतचा मद्यतस्कर वापर करून करून घेतात. वेगवेगळ्या वाहनांचाही वापर करतात. खासगी वाहने, ट्रक, मेटॅडोरपासून तो छोट्या वाहनांपर्यंत सर्वच वाहनांचा तस्कर नागपुरातून चंद्रपुरात मद्य नेण्यासाठी उपयोग करतात. गेल्या काही दिवसांपासून नागपूरसह ठिकठिकाणचे पोलीस वाहनांवर नजर ठेवून असल्याचे लक्षात आल्याने निर्ढावलेले आरोपी स्वत:च रेल्वेने मद्य नेतात. बुधवारी असेच काही मद्यतस्कर दारूची मोठी खेप चंद्रपुरात नेणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मिळाली. त्यावरून या पथकाने सीताबर्डी टेकडी गणेश मंदिर पुलाच्या खाली सापळा लावला. बुधवारी रात्री १०. ३० च्या सुमारास एका पाठोपाठ काहीजण संशयास्पद अवस्थेत जाताना दिसले. पोलिसांनी शिताफीने त्यांचा पाठलाग केला आणि तब्बल सात जणांना ताब्यात घेतले.
त्यांच्या जवळच्या साहित्याची पोलिसांनी तपासणी केली असता पाचपन्नास नव्हे तर तब्बल ८६३ दारूच्या बाटल्या पोलिसांना आढळल्या. ज्यात ब्लेंडर प्राईड, आॅफिसर चॉईस, मॅकडॉल नंबर -१ सारख्या विदेशी ब्रॅण्डच्या मद्याचा समावेश आहे. पोलिसांनी हा दारूसाठा जप्त केला. आरोपींकडून पोलिसांनी ६ मोबाईल आणि रोख रकमेसह एकूण २ लाख, ४ हजार, ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अशोक मेश्राम, एएसआय नागोराव इंगळे, हवलदार सुधाकर धंदर, कृपाशंकर शुक्ला, देवेंद्र चव्हाण, अजय रोडे, नायक बबन राऊत, आशिष क्षीरसागर यांनी ही कामगिरी बजावली.
अटकेतील मद्यतस्कर
शाहरूख खान, हरीश ऊर्फ पिंटू श्रावण उईके, सूरज हरिप्रसाद सूर्यवंशी, भूषण दीपक पासफूलकर, अजय दीपक जाधव, सुनील रामजी मंडल आणि आशिष पुरुषोत्तम नारनवरे अशी अटकेतील तस्करांची नावे आहेत. हे सर्व चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरचे रहिवासी आहेत.