नोकरीच्या आमिषाने १४० जणांची फसवणूक, ४८ लाख हडपले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 03:42 AM2019-11-30T03:42:05+5:302019-11-30T03:42:15+5:30

सीमा शुल्क विभागात वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून एका भामट्याने १४० जणांची फसवणूक केली आहे.

cheat 140 people | नोकरीच्या आमिषाने १४० जणांची फसवणूक, ४८ लाख हडपले

नोकरीच्या आमिषाने १४० जणांची फसवणूक, ४८ लाख हडपले

Next

नवी मुंबई/पनवेल : सीमा शुल्क विभागात वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून एका भामट्याने १४० जणांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी ४८ लाख रुपये घेऊन पलायन केलेल्या संतोष पाटील विरोधात गुरुवारी खारघरमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

खारघरच्या सेक्टर १५ मध्ये राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या योगिता कडू यांना फेब्रुवारी संतोष पाटील याने फोन केला. नोवाईक असल्याचे सांगून भेटण्यासाठी वेळ मागितली. भेटीत केंद्रीय सीमा शुल्क व उत्पादन शुल्क विभागामध्ये वरिष्ठ अधिकारी असल्याचे सांगितले. सीमा शुल्क विभागामध्ये कर्मचारी भरतीचे काम करत असून तुमच्या संपर्कात कोणी असल्यास त्याला माझा संपर्क नंबर द्या, असेही सांगितले. अधिकाºयाच्या वेशातच भेटण्यासाठी घरी आल्यामुळे व ओळखपत्रही दाखविल्यामुळे त्याच्यावर विश्वास बसला. योगिता यांना नोकरीची आवश्यकता आहे. याशिवाय पुतण्या अमर कडू, परेश कडू, राज कडू, याशिवाय परिचितांपैकी निमिता पाटील, नीलेश ठाकूर, अनिकेत पाटील, जयेश ठाकूर, लोचना पाटील, नयना ठाकूर, निकेत तांडेल, दिनेश पाटील, अक्षय म्हात्रे, संदीप म्हात्रे, संगिता विणेरकर यांनाही नोकरीची आवश्यकता आहे. त्यांना नोकरी मिळवून देता येईल का? अशी विचारणाही केली. पाटीलाने शिक्षणाप्रमाणे शिपाई, सुरक्षारक्षक, सीमा शुल्क अधिकारिपदावर नियुक्ती करण्यासाठी पदाप्रमाणे ३५००, १०५००, २५ हजार, ३५ हजार शुल्क भरावे लागतील, असे सांगितले.

फेब्रुवारी ते आॅगस्ट २०१८ दरम्यान १४० जणांनी त्याच्याकडे तब्बल ४८ लाख रुपये जमा करत आवश्यक ती कागदपत्रेही सादर केली. ज्यांनी पैसे भरले त्यांना गणवेश व नामफलक देऊन त्या सगळ्यांना फोटो काढण्यास सांगितले. सर्वांची यादी करून ती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखविण्यासाठी पाटील घेऊन गेला. थोड्या दिवसांनी रिव्हाल्वर परवान्यासाठी पुन्हा १५ हजार ५०० रुपयांची मागणी केली. यामुळे सर्वांना संशय आला. त्याने दिलेली ओळखपत्र व नियुक्तीपत्राविषयी खात्री केली असता सर्व बोगस असल्याचे निदर्शनास आले. यामुळे या प्रकरणी गुरुवारी खारघर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खोटी नियुक्ती पत्रे
संतोषने पैसे भरलेल्या जवळपास १४० जणांना खोटी नियुक्ती पत्रे दिली आहेत. सर्व्हिस बुक, मेडिकल कार्डही दिले होते. लवकरच या सर्वांची न्हावा-शेवा, ठाणे, दिघी, नागोठणे, नाशिक, देवळाली व इतर ठिकाणी नियुक्ती केली जाणार असल्याचे आश्वासन दिले होते. फेब्रुवारी, २०१८ पासून अनेकांकडून पैसे घेत होता. नोकरी लावण्यासाठी विलंब होत असल्याने सर्वांनी विचारणा करण्यास सुरुवात केली. तेव्हा मला १४ हजार जणांच्या नियुक्तीचे काम करायचे आहे. यामुळे विलंब होत असल्याचे सांगितले होते. मार्च, २०१९ नंतर त्याचे पाचही नंबर बंद लागले.
 

Web Title: cheat 140 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.