Shilpa Shetty, Raj Kundra: शिल्पा शेट्टी, राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; मुंबईत दीड कोटीच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 11:51 AM2021-11-14T11:51:15+5:302021-11-14T11:52:18+5:30
Shilpa Shetty, Raj Kundra Cheating case: दोन वर्षांपूर्वी ठाण्यामध्ये देखील फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. हे जोडपे जेवढे प्रसिद्ध आहे तेवढेच कुप्रसिद्धही होत चालले आहे. राज कुंद्रा नुकताच पॉर्न फिल्मप्रकरणात जामिनावर बाहेर आला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि नुकताच पॉर्न फिल्म प्रकरणात अडकलेला तिचा नवरा राज कुंद्रा यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. या हाय प्रोफाईल दांम्पत्याविरोधात मुंबईतील बांद्रा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी ठाण्यामध्ये देखील फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
मीडिया रिपोर्यनुसार नितीन बराई नावाच्या व्यक्तीने शिल्पा आणि राज कुंद्राविरोधात 2014 पासून फसवणूक करत असल्याची तक्रार दिली आहे. बराई यांच्या तक्रारीवरून शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांच्यासह अन्य आरोपींविरोधात आयपीसी 406, 409, 420, 506, 34 आणि 120 (बी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु करण्यात आला आहे. मुंबई पोलीस लवकरच या प्रकरणी आरोपींची चौकशी करू शकतात. तसेच या प्रकरणी राज कुंद्रा आणि शिल्पाशी पोलीस संपर्क साधण्याची शक्यता आहे.
बराई यांनी पोलिसांना सांगितले की, जर शिल्पा आणि राज यांच्या कंपनीची फ्रँचायझी घेऊन पुण्याच्या कोरेगाव भागात स्पा आणि जिम उघडली तर खूप फायदा होईल. त्यांच्यावर विश्वास ठेवून बराई यांनी 1 कोटी 59 लाख 27 हजार रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, आरोपींनी त्यांच्या पैशांचा वापर आपल्या फायद्यासाठी केला. एवढेच नाही जेव्हा त्यांनी पैसे परत मागितले तेव्हा धमकी देखील देण्यात आली.
राज कुंद्रा याला जुलैमध्ये पॉर्न फिल्म बनविल्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली होती. या आरोपाखाली राज कुंद्रा दोन महिने तुरुंगात होता. सध्या राज कुंद्रा जामिनावर बाहेर आहे.