मुंबई - मंदिराच्या ट्रस्टला 20 टक्के कमिशनवर दोन हजार रुपयांच्या नोटांची गरज असल्याचे सांगून खेळण्यातील चिल्ड्रन्स बँकच्या नोटा देणाऱ्या गँगच्या एकास अटक करण्यात वडाळा टी. टी. पोलिसांना यश आले आहे. आरोपीच्या गँगने जोगेश्वरीत राहणाऱ्या एका व्यापाऱ्याला गंडा घातला होता. मुंबई व परिसरातही आरोपींनी अशा पद्धतीने अनेकांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना आहे. इसरार शेख(52) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून सहाय्यक पोलिस निरीक्षक भास्कर जाधव व त्यांच्या पथकाने दीड महिना त्याचा माग काढून मोठ्या शिताफीने त्याला गोवंडीतून अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे टोळके मुंबईतील विविध परिसरात कार्यरत आहे. जोगेश्वरीतील एक स्टेशनरी दुकानदार त्यांच्या फसवणूकीला बळी पडला होता. आरोपींनी मंदिराच्या एका ट्रस्टला मिळालेली दानाची रक्कम खूप मोठी असून ते सुटे पैसे एका खोलीत ठेवण्यासाठी दोन हजार रुपयांच्या नोटांची आवश्यकता आहेत. त्यासाठी दिलेल्या रकमेच्या 20 टक्के कमिशन देण्यात येईल, असे आमिष आरोपीने तक्रारदाराला दाखविले होते.
20 टक्के कमिशनच्या नावाखाली चिन्ड्रन्स बँकेच्या नोटा देऊन फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 12:02 AM