अल्फा लाव्हल कंपनीच्या भागधारकांची बनावट खाती उघडून साडेतीन कोटींची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 12:49 PM2018-12-28T12:49:12+5:302018-12-28T12:58:54+5:30
अल्फा लाव्हल कंपनीच्या भागधारकांची बनावट खाती उघडून कंपनीची ३ कोटी ६२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पुणे : अल्फा लाव्हल कंपनीच्या भागधारकांची बनावट खाती उघडून कंपनीची ३ कोटी ६२ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने नवी मुंबईतून एका शेअर एजंटला अटक केली आहे़.
सोनु निर्मला अगरवाल (वय ३८, रा़ पांडे निवास, आनंदनगर, नवी मुंबई) असे त्याचे नाव आहे़. त्याने लिंक ईनटाईम इंडिया या कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी यांना बनावट बँक खाती उघडण्यास मदत केली होती़.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, अल्फा लाव्हल या कंपनीतील भाग हे स्टॉक एक्सचेंजमधून डिलिट करण्यात आल्यानंतर त्यांचे काही भागधारकांचे भाग हे रद्द झाले होते़. या भागधारकाचे कंपनीतील असलेल्या शेअर्सच्या बदल्यात त्यांना प्रति शेअर्स ४ हजार रुपये देण्याचे ठरले़. या शेअर्सची रक्कम लिंक ईनटाईम इंडिया या कंपनीने त्यांचे उपलब्ध असलेल्या व त्यांनी दिलेल्या रेकॉर्डवरुन भागधारकांना देण्यात येत होते़. त्या दरम्यान काही भागधारक हे मृत्यु पावलेतर काहींचे पत्ते बदलले़त्यामुळे हे भागधारक परत कधीच कंपनीला मिळून येणार नाहीत़, अशी लिंक ईनटाईम इंडिया कंपनीतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना खात्री झाली़. या कंपनीच्या ढोले पाटील येथील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकमेकांच्या साथीने संबंधित १८ भागधारकांची ओळखपत्रे, रहिवासी पुरावा, बँकेची कागदपत्रे, मागणीपत्र अशी कागदपत्रे खोटी तयार केली व या भागधारकांना शेअर्सचे पैसे दिले असे दाखवून त्यांनी अल्फा लाव्हल कंपनीची ३ कोटी ६२ लाख रुपयांची फसवणूक केली़. हा सर्व प्रकार २०१५ मध्ये घडला होता़ दरम्यान, कंपनीला ही माहिती झाल्याने कंपनीच्या वतीने जुलै २०१८ मध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिली होती़.
अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त ज्योती प्रिया सिंग, सहायक पोलीस आयुक्त निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन जाधव, पोलीस शिपाई अमृता हरबा, संदीप गिºहे यांनी तपास केला़. मुंबईतील शेअर बाजारात कमिशन एजंट म्हणून काम करणाऱ्या सोनू अगरवाल याने या अधिकारी व कर्मचाऱ्यांना या भागधारकांची बँकेत खाते काढण्यासाठी मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले़. त्यावरुन सोनू अगरवाल याला गुरुवारी नवी मुंबईतून अटक करण्यात आली आहे़. त्याकडे लिंक ईनटाईम इंडिया कंपनीतील कोणत्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्याने मदत केली, याची चौकशी करण्यात येणार आहे़.