मुंबई- श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांनी आज महाराष्ट्राचे उपमु्ख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी भाजपाचे नेते किरीट सोमय्या देखील उपस्थित होते. या भेटीत तुम्हाला न्याय मिळवून देण्याचं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती विकास वालकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. तसेच आफताबने पूनावाला याने माझ्या मुलीची हत्या केली. त्याला कठोर शिक्षा व्हायला हवी, तसेच त्याच्या कुटुंबियांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विकास वालकर यांनी केली.
आफताब, त्याचे कुटुंबीय अन् पोलीस; श्रद्धाचे वडील फडणवीसांना भेटले, माध्यमांसमोर सर्व बोलले!
माझ्या मुलीसोबत जे झाले, असं कोणासोबतही होऊ नये, अशी माझी अपेक्षा असल्याचं विकास वालकर यांनी बोलावून दाखवलं. तसेच १८ वर्षांनंतर स्वातंत्र्य दिले जाते, यावर विचार व्हावा, अशी मागणी देखील विकास वालकर यांनी केली आहे. तसेच मी आता मोठी झाली आहे. त्यामुळे मी माझा निर्णय घेऊ शकते. मी आता काहीही करु शकते, असं श्रद्धा घर सोडताना म्हणाली होती. मात्र आजच्या युगाचा विचार करता, १८ वर्षांनंतरच्या स्वातंत्र्यावर बॅन आणण्याबाबत विचार करण्याची गरज असल्याची मागणी विकास वालकर यांनी केली आहे.
दिल्ली पोलीस आणि मुंबई पोलिसांचे काम व्यवस्थित सुरु आहे. वसई पोलिसांनी सहकर्य केले नाही. त्यांनी तक्रार दाखल झाल्यानंतर लगेच कारवाई केली असती, तर आज माझी मुलगी जिवंत असती. वसई येथील तुळीज पोलीस स्टेशन व मणिपूर पोलीस स्टेशन यांच्या काही असहकार्याच्या भूमिकेमुळे मला बराच त्रास सहन करावा लागला, असा आरोपही विकास वालकर यांनी यावेळी केला. त्यामुळे राज्य सरकार यावर कोणती भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आफताबची २ टप्प्यांत १० दिवस कसून चौकशी
श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिचे शिर कुठे टाकून दिले, याचा शोध पोलीस घेत आहेत. यासंदर्भात एक तलावही रिकामा करण्यात आला. हरतऱ्हेने आफताबची चौकशी केली जात आहे. परंतु, पोलिसांना ठोस असे काहीच मिळत नसल्याचे म्हटले जात आहे. नार्को टेस्टनंतर आफताबकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांना असा कोणताही मोठा पुरावा मिळालेला नाही. जेणेकरून हे प्रकरण पुढे जाऊ शकेल. आफताबच्या चलाखीमुळे पोलिसांच्या हाती काही लागत नसून, पोलीस पुराव्यासाठी कठोर मेहनत घेताना दिसत आहेत. पोलिसांनी आफताबची आतापर्यंत दोन टप्प्यांमध्ये १० दिवस कसून चौकशी केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"