शहराची लाईफलाईन धोक्यात; इतिहासातील मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 02:39 PM2019-03-01T14:39:08+5:302019-03-01T14:44:34+5:30
मुंबई, अहमदाबाद, रतलाम, बडोदा, राजकोट आणि भावनगर रेल्वे सुरक्षा दलाच्या आयुक्तांना पश्चिम रेल्वेच्या मुख्य सुरक्षा आयुक्त, महानिरीक्षकांनी हे पत्र पाठवले आहे.
मुंबई - पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेच्या मुख्य सुरक्षा आधिकाऱ्यांनी इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. याबाबत मुंबई, अहमदाबाद, रतलाम, बडोदा, राजकोट आणि भावनगर रेल्वे सुरक्षा दलाच्या आयुक्तांना पश्चिम रेल्वेच्या मुख्य सुरक्षा आयुक्त, महानिरीक्षकांनी हे पत्र पाठवले आहे. याबाबत बोलताना पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, आमची कालच याविषयी अधिकाऱ्यांशी बैठक पार पडली असून आम्ही रेल्वे स्टेशन्सवर हाय अलर्ट जारी केलेला आहे.
रेल्वे प्रशासनाला पोलिसांकडून मिळालेल्या फॅक्सनुसार १४ फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर दहशतावादी हल्ला होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. इतिहासातील सर्वात मोठा बॉम्ब हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची भीती या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. रेल्वे स्टेशन, मंदिरे या ठिकाणी बॉम्ब हल्ला केला जाऊ शकतो. तसेच गुजरातमधील काही सार्वजनिक ठिकाणे, रेल्वे स्टेशन, स्टॅचू ऑफ युनिटी उद्ध्वस्त करण्यासाठी साखळी बॉम्बस्फोट घडवले जाऊ शकतात.
काय आहे पत्रात नमूद?
मोहम्मद इब्राहिम नावाच्या ग्रेडर हैदराबादच्या व्यक्तीसोबत रेहान नावाचा सुसाईड बॉम्बर तसेच एक वयस्कर महिलाही आहे. मोहम्मद इब्राहिम हा पुलवामा हल्ल्याशी संबंधित असून हे तिघेही मसूद अझरच्या दहशतवादी गटाशी संबंधित आहे. या दहशतवाद्यांच्या रडारवर रेल्वे स्थानक असल्याचेही पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. तसेच पश्चिम रेल्वेमार्गावरील सर्व स्टेशन आणि रेल्वेवर कडक नजर ठेवण्यास सांगण्यात आले आहे. विशेषतः जम्मू काश्मीरहून येणाऱ्या लोकलकडे जास्त लक्ष द्या असं पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.