ब्राझिलच्या नागरिकाकडून अडीच कोटींचे कोकेन जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 06:29 AM2018-08-13T06:29:23+5:302018-08-13T06:29:33+5:30
मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ब्राझिलच्या नागरिकाकडून अडीच कोटी रुपये किमतीचे कोकेन जप्त केले.
मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ब्राझिलच्या नागरिकाकडून अडीच कोटी रुपये किमतीचे कोकेन जप्त केले. इथिओपियामधून ही व्यक्ती शनिवारी मुंबईत आली होती व नंतर दिल्लीला जाणार होती. या व्यक्तीने आपल्या बॅगेमध्ये टाल्कम पावडरच्या डब्यात कोकेन लपविले होते.
मुंबई विमानतळावर तपासणी करताना, सीआयएसएफच्या जवानांना या व्यक्तीच्या बॅगेतील वस्तूंबाबत संशय आल्याने त्यांनी अधिक तपासणी केली. त्या वेळी टाल्कम पावडरच्या डब्यातून कोकेनची तस्करी केली जात असल्याचे उघड झाले. एफ. नस्किमेन नावाच्या या व्यक्तीला सीआयएसएफने संशयावरून ताब्यात घेतले व त्याची सखोल चौकशी केली. तपासणीमध्ये त्याच्याकडे कॅप्सूलमध्ये भरलेली व सील केलेली ४५७ ग्रॅम कोकेन पावडर जप्त करण्यात आली.
आरोपी व त्याच्याकडील कोकेन पुढील कायदेशीर कारवाईसाठी अमली पदार्थ विरोधी पथकाकडे सोपविण्यात आल्याची माहिती सीआयएसएफच्या अधिकाºयांनी दिली.