स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी याला इंदूर पोलिसांनीअटक केली होती. इंदूर येथे आयोजित एका 'कॉमेडी शो'मध्ये हिंदू देवी-देवता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल अभद्र भाषेत टीका केल्याचा आरोप फारुकी याच्यावर करण्यात आला आहे. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या कॉमेडियन मुनव्वर फारुकीला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळालेला आहे. महिन्याभरापेक्षा जास्त काळ तुरुंगात घालवल्यानंतर मुनव्वरला सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे.
अलीकडेच मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठाने फारुकीची जामीन याचिका फेटाळली होती. बंधुता व सद्भावना प्रबळ करणे हे प्रत्येक नागरिकाचे घटनात्मक कर्तव्य असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. एका कार्यक्रमादरम्यान या विनोदी कलाकाराने हिंदू देवतांचा अपमान करत धार्मिक भावनांची खिल्ली उडविल्याचा आरोप आहे. स्थानिक भाजपा आमदाराच्या मुलाने फारुकी विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी मुनव्वर फारुकी आणि त्याच्यासह चार अन्य लोकांना अटक करण्यात आली.
नेमकं प्रकरण काय?इंदूरमध्ये सेक्टर ५६ येथील एका कॅफेमध्ये शुक्रवारी नववर्षाच्या स्वागतासाठी 'कॉमेडी शो'चं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला भाजपच्या स्थानिक आमदार मालिनी लक्ष्मणसिंह गौर यांचा मुलगा एकलव्य सिंह गौर (३६) आपल्या मित्रांसह उपस्थित होता. कार्यक्रमात केल्या गेलेल्या काही टिप्पणींवर एकलव्य याने आक्षेप घेतला आणि कार्यक्रम थांबवला. त्यानंतर कार्यक्रमाच्या व्हिडिओ फुटेजसह एकलव्य यांनी थेट पोलीस ठाणे गाठले.
मुनव्वर फारुकी हे मुळचे गुजरातच्या जुनागडचे रहिवासी आहेत. व्हिडिओ फुटेजच्या आधारावर पोलिसांनी फारुकी आणि त्यांच्यासोबतच्या चार इतर लोकांविरोधात तक्रारीची नोंद केली आहे.
"मी आणि माझे काही मित्र तिकीट खरेदी करुन या कार्यक्रमाला उपस्थित होतो. कार्यक्रमाला फारुकी हे प्रमुख कॉमेडियन म्हणून उपस्थित होते. यावेळी फारुकी यांनी अभद्र टिप्पणी करत हिंदू देव-देवतांची खिल्ली उडवली. त्यानंतर गोध्रा हत्याकांड प्रकरणावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचाही चुकीच्या पद्धतीने उल्लेख केला गेला", असं एकलव्य गौर म्हणाले. यासोबतच इतर गोष्टींवरुनही या कार्यक्रमात चुकीच्या गोष्टींवर भाष्य सुरूच होतं. याचे व्हिडिओ चित्रीकरण करुन आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचा निर्णय घेतला, असंही ते पुढे म्हणाले. कोरोना काळात प्रशासनाची परवानगी न घेता या कार्यक्रमाचं आयोजन केल्याचाही आरोप एकलव्य गौर यांनी केला आहे. कार्यक्रमात कोरोना संबंधिचे नियम धाब्यावर बसविण्यात आले होते. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचेही उल्लंघन करण्यात आले, असंही एकलव्य यांचं म्हणणं आहे.