वाहतूक पोलिसांकडे तक्रार केल्याने भररस्त्यात तरुणीला मारहाण करून फाडले तिचे कपडे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2018 06:24 PM2018-11-09T18:24:34+5:302018-11-09T18:24:58+5:30
याप्रकरणी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
बंगळुरू - भररस्त्यात मध्यभागी गाडी उभी करणाऱ्याची वाहतूक पोलिसांकडे तक्रार केली म्हणून एका २५ वर्षीय तरुणीला मारहाण करून तिचे कपडे फाडल्याची धक्कादायक घटना कैकोन्ड्रहल्ली परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
मंजुनाथ नावाच्या व्यक्तीने कैकोन्ड्रहल्ली परिसरात रस्त्याच्या मध्यभागी गाडी पार्क केली होती. यामुळे परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. एका व्यक्तीने त्याला जाऊन गाडी बाजूला घेण्याची विनंती केली असता मंजूनाथने त्याच्या श्रीमुखात लगावली. यावेळी ऑफिसमधून घरी जाणाऱ्या एका २५ वर्षांच्या तरुणीने गाडी बाजूला उभी करून समोर काहीही कारवाई न करता उभ्या असणाऱ्या वाहतूक पोलिसांकडे त्याची तक्रार केली. त्यानंतर मंजूनाथ गाडीतून उतरला आणि पोलिसांसमोर त्याने तिला कानाखाली लगावली. तिने हेल्मेट घातलं असल्यामुळे तिला दुखापत झाली नाही. मात्र मंजूनाथला प्रतिकार करण्याचा तिने प्रयत्न केला असता त्याने तरुणीला मारहाण केली आणि त्याने तिचे कपडे फाडले. त्यानंतर काही क्षणातच लोक जमा झाले. त्यांनी मंजूनाथला पोलिसांच्या हवाली केले. मात्र, हे सर्व घडेपर्यंत वाहतूक पोलिस कर्मचारी ठम्मपाने तमाशा पाहत उभा होता, असा आरोप तरूणीने केला आहे. मंजूनाथने तो एका उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्याचा मुलगा असल्याचा दावा केला आहे. त्याने मित्रांसोबत स्थानिकांना आणि पोलीस कर्मचाऱ्याला दम दिला. या प्रकारामुळे बंगळुरूत खळबळ माजली आहे. पोलिसांनी याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.