द्वारका - गुजरातमधील द्वारका येथे गुरुवारी एक अतिशय लाजीरवाणी घटना समोर आली. कथावाचक मोरारी बापूंवर भाजपचे माजी आमदार पबुभा मानेक यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ते बापूंकडे पोहचण्यापूर्वी भाजपा खासदार पूनम माडम आणि मोरारी बापूसोबत बसलेल्या इतरांनी त्यांना रोखले. तरीही मानेक यांनी मोरारी बापूंना शिवीगाळ केली.
खासदार पूनम माडम म्हणाल्या की, देवाबद्दल काही चुकीचे विधान असल्यास भक्तांवर संताप होणे स्वाभाविक आहे. वास्तविक, मोरारी बापूंनी काही दिवसांपूर्वी यूपीमधील एका कथेदरम्यान भगवान श्रीकृष्णाबद्दल एक विधान केले होते.
भगवान श्रीकृष्ण यांच्यावर वादग्रस्त विधान
भगवान कृष्णाच्या वंशजांवर बापूंनी आक्षेपार्ह भाष्य केले होते, श्रीकृष्णाचे भाऊ बलराम याला मद्यपी म्हटले होते. कथेच्या या भागाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याला कडाडून विरोध करण्यात आला. हा वाद वाढत असल्याचे पाहून मोरारी बापूंनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आणि श्रीकृष्ण भक्तांची क्षमा मागितली. व्हिडीओमध्ये बापूंनी सांगितले की, माझ्यामुळे कोणी दु:खी होण्यापूर्वी मला समाधी घेणं आवडेल. व्हिडीओमध्ये मोरारी बापू खूप अस्वस्थ दिसत होते आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहात होते. हे अश्रू माझ्या डोळ्यातून नव्हे तर आत्मामधून येत आहेत असं ते म्हणाले होते.