मुंबईतील पश्चिम उपनगरातील अंधेरी पूर्व येथील इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून ४४ वर्षीय महिलेने आपल्या ७ वर्षीय मुलासोबत उडी मारून आपले जीवन संपवले आहे. सोमवारी घडलेल्या या चित्तथरारक घटनेपूर्वी ३० मेला महिलेने फेसबुकवर पोस्ट अपलोड केली होती. त्या पोस्टमध्ये कोरोनामुळे त्यांच्या पतीचा अचानक मृत्यू झाल्यामुळे त्यांची परिस्थिती खालवल्याबाबत नमूद केले होते.
चांदिवली येथील नहर अमृत रोडवरील तुलिपिया इमारतीत हा धक्कादायक प्रकार घडला. रेश्मा त्रेंचिल (४४) असे मृत महिलेचे नाव असून त्यांच्यासोबत गरूड (७) या त्यांच्या मुलाचा मृतदेहही सापडला होता. त्यांचे मुंबईत कुणीही नातलग नसून मृत महिलेचा भाऊ अमेरीकेतून येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर मृतदेह कुटुबियांना सुपूर्त करण्यात येतील.
शरद मुलूकुट्ला (४९) असे रेश्मा यांच्या पतीचे नाव होते. ते ऑनलाई ट्रेडिंग प्लॅटफोर्वर ऍग्रीकल्चरल कमोडिटी विभागात प्रमुख म्हणून काम करत होते. रेश्मा या गृहिणी होत्या. त्यांचे पतीचे आई-वडील वाराणसीमध्ये राहतात. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार मिळावे म्हणून शरद हे वारणसीला गेले होते. मात्र, दुर्दैवाने शरद यांनाही कोरोना झाला. चार महिने कोरोनाशी झुंज दिल्यानंतर शरद यांचा मृत्यू झाला होता.
पतीच्या मृत्यूनंतर रेश्मा यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. त्यात पतीच्या अचानक झालेल्या निधनामुळे जीवन कसे बदलले आहे. हे त्यांनी त्या पोस्टमध्ये नमूद केले होते. जीवन जगताना कशा अडचणी येत आहेत, याबाबत त्यांनी लिहीले होते. त्यानंतर ही घटना घडल्यामुळे त्यांनी याच कारणामुळे आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान रेश्मा यांच्या घरी अद्याप कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. याप्रकरणी साकीनाका पोलीस अधिक तपास करत आहेत.