मनाेर : मास्क लावण्यास सांगितले म्हणून दुर्वेस ग्रामपंचायतीच्या शिपायाला ८ ते ९ जणांनी रविवारी बेदम मारहाण करून शिवीगाळ केली. याप्रकरणी मनाेर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामपंचायत हद्दीतील दूध कंपनीचे कर्मचारी दुर्वेस नाक्यावर गणेश मारवाडी यांच्या दुकानावर साहित्य घेण्यासाठी आले हाेते. तेव्हा शिपाई विष्णू तुंबडा यांनी त्याला ताेंडाला मास्क बांधण्यास सांगितले. त्याचा राग मनात धरून तुंबडा यांना शिवीगाळ आणि ठाेशाबुक्क्यांनी मारहाण केली.पालघर जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनी सर्व ग्रामपंचायत, नगरपालिकांना कोविड १९च्या नियमांचे कडक पालन करण्याचे आदेश काढले आहेत. त्यानुसार दुर्वेसचे सरपंच आणि ग्रामसेवकांनी कर्मचाऱ्यांना या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार तुंबडा यांनी आराेपींना मास्क लावण्याची सूचना केली हाेती. मात्र त्यांना मारहाण करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकाराची दखल घेत हेरिटेज कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी राजू तुंबडा, उपेंद्र परदेशी, रामचंद्र तुंबडा, जयेंद्र अत्कारी, प्रीतेश धानवा, विष्णू दिवाळ, गंगाराम तुंबडा यांनी केली. आम्ही तातडीने ग्रामसभा घेऊन कंपनीविराेधात एकमताने अविश्वास ठराव मंजूर करून कंपनी बंद करू. ग्रामपंचायत परिसरातील ग्रामस्थांना विश्वासात न घेता त्यास परवानग्या दिल्या आहेत. भूमिपुत्रांना रोजगार दिलेला नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून शिपाई तुंबडा यांनी त्यांच्या लाेकांना मास्क लावण्यासाठी बोलला असता त्याला बेदम मारहाण केली. हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असे पालघर जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती विष्णू कडव यांनी सांगितले.
coronavirus:मास्क लावायला सांगितले म्हणून शिपायाला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 2:35 AM