ठाणे - जगभरात थैमान घातलेल्या करोना विषाणूसंदर्भात अफवा पसरवल्याप्रकरणी तसेच जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी येथील नारपोली पोलीस ठाणे येथे एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाबाबत अफवा पसरवल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेला हा ठाणे जिल्ह्यातील पहिलाच गुन्हा आहे. पोलीस उपायुक्त पोलीस राजकुमार शिंदे आणि त्यांच्या पथकाने बाळसाहेब सर्जेराव डावखर, वैद्यकीय अधिकारी, खारबाव प्राथमिक आरोग्य केंद्र, भिवंडी यांच्या तक्रारीवरुन ही कारवाई केली आहे. अरिहंत मॅट्रेसेसचे मालकांनी 13 मार्च रोजी एका गुजराती दैनिक वृत्तपत्रात ‘‘ arihant mattress ANTI-CORONA VIRUS Mattress पे सोएगा इंडिया, तो बढेगा इंडिया CORONA RESISTANCE MATTRESS (6ft x 6ft x 5in) Rs 15000/- Visit our Sleep Gallery @ Wooden' Za Furniture Kasheli ( Furniture Market) Bhiwandi या मथळयाखाली जाहिरात दिली होती. या मॅट्रेसमुळे कोरोना विषाणूला प्रतिबंध होईल असे जनतेच्या मनामध्ये समजूत करून जनतेची दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिध्द केली होती. तसेच या मॅट्रेस वुडनझा फर्निचर, कशेळी, भिवंडी आणि बिल्डींग क्र. सी-15, गाळा क्र 101, 102, पारसनाथ कॉम्पलेक्स, वळपाडा, दापोडा रोड, पोस्ट अंजुर, ता भिवंडी, जि. ठाणे येथे विक्रीकरीता उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे त्याव्दारे त्यांनी कोरोना विषाणूला प्रतिबंध होईल असा खोटा दावा करुन जनतेमध्ये अफवा पसरविली. त्यामुळे या कंपनीच्या मालकाविरुद्ध नारपोली पोलीस ठाणे येथे भा. दं. वि. कलम 505(2), आपत्ती व्यवस्थापन कायद कलम 52 सह औषधीद्रव्य व तिलस्मी उपचार (आक्षेपार्ह जाहीराती) अधिनियम 1954 कलम 3,4,5 अन्वये गुन्हा दाखल असून त्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भाट करीत आहेत.
Coronavirus : कोरोनाला रोखणाऱ्या गादीची जाहिरात भोवली; अरिहंत मॅट्रेसविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 3:26 PM
Coronavirus : पोलीस उपायुक्त पोलीस राजकुमार शिंदे आणि त्यांच्या पथकाने बाळसाहेब सर्जेराव डावखर, वैद्यकीय अधिकारी, खारबाव प्राथमिक आरोग्य केंद्र, भिवंडी यांच्या तक्रारीवरुन ही कारवाई केली आहे.
ठळक मुद्देत्यांनी कोरोना विषाणूला प्रतिबंध होईल असा खोटा दावा करुन जनतेमध्ये अफवा पसरविली. कंपनीच्या मालकाविरुद्ध नारपोली पोलीस ठाणे येथे भा. दं. वि. कलम 505(2), आपत्ती व्यवस्थापन कायद कलम 52 सह औषधीद्रव्य व तिलस्मी उपचार (आक्षेपार्ह जाहीराती) अधिनियम 1954 कलम 3,4,5 अन्वये गुन्हा दाखल