मुंबई - राज्यात आतापर्यंत ४१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून कोरोना फैलाव रोखण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी मुंबईतील पब्स, डिस्कोथेक्स, डान्स बार, डी.जे. लाईव्ह व तत्सम आस्थापने ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश पोलीस उपायुक्त एन. अंबिका यांनी मुंबईतील सर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस उपायुक्त, सहाय्य्क पोलीस आयुक्त यांना जारी केले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कुठेही गर्दी होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. १७ मार्च ते ३१ मार्चपर्यंत शहर व उपनगरातील सर्व डिस्कोथेक्स, डान्स बार, ऑर्केस्टा बार, डी.जे. लाईव्ह, बॅंड व इतर आस्थापने बंद ठेवण्याबाबतचे आदेश शासनाकडून मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत. त्यानुसार तात्काळ निर्णय घेऊन याबाबत अंमलबजावणी करण्याचे आदेश मुंबईतील सर्व ९४ पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत. दिलेल्या कालावधीत प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पब्स, डिस्कोथेक्स, डान्स बार, डी.जे. लाईव्ह व तत्सम आस्थापने चालू राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे आणि त्याप्रमाणे सक्त अंमलबजावणी तातडीने करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.