नवी मुंबई : कोरोनाच्या चाचणीसाठी नमुने घेऊन त्यांना बनावट निगेटिव्ह रिपोर्ट देणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी रबाळे एमआयडीसी मधील एका कंपनीच्या १३३ कामगारांचे बनावट रिपोर्ट दिल्याचे समोर आले आहे.
कंपनीत काम करणाऱ्या कामगारांची कोरोना चाचणी आवश्यक असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार रबाळे एमआयडीसी मधील प्रवीण इंडस्ट्रीज या कंपनीने कामगारांची कोविड चाचणी घेण्यासाठी ८ एप्रिल रोजी कंपनीत शिबीर भरवले होते. यासाठी त्यांनी ठाणेतील मिडटाऊन डायग्नोस्टिक लॅबचा मालक देविदास घुले याला कळवण्यात आले होते. यानुसार त्याने कल्याण येथील परफेक्ट हेल्थ केअरचा मालक महमद वसीम अस्लम शेख याच्या मदतीने हा कॅम्प घेतला होता. शेख याला थायरोकेअर लॅबने कोरोना चाचणीचे नमुने जमा करण्यासाठी नेमलेले आहे. त्यानुसार १३३ कामगारांचे नमुने थायरोकेअर लॅब मध्ये चाचणीला पाठवणार असल्याचे त्याने सांगितले होते. काही दिवसांनी त्याने सर्व कामगारांचे रिपोर्ट कंपनीकडे सोपवले होते. मात्र मिळालेल्या रिपोर्टवर कंपनीला संशय आल्याने त्यांनी थायरोकेअर लॅबमध्ये चौकशी केली. यावेळी सर्वच रिपोर्ट बनावट असल्याचे उघड झाले. त्यामुळे थायरो केअर लॅबच्या वतीने रबाळे एमआयडीसी पोलीसांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक नितीन गीते यांनी निरीक्षक रामचंद्र घाडगे, सहायक निरीक्षक यशवंत पाटील, हवालदार विश्वास काजरोळकर, संजय कांबळे, वैभव पोळ यांचे पथक केले होते. त्यांनी गुरुवारी दुपारी ठाणे व कल्याण येथून देविदास घुले व महमद शेख याला अटक केली आहे. या जोडीने बनावट कोरोना रिपोर्ट देऊन कंपनीची, थायरो केअरची तसेच कोविड १९ च्या संबंधित निष्काळजीपणा केला होता. त्यांच्या या कृत्यामुळे कामगारांच्या आरोग्याशी देखील धोका निर्माण झाला आहे. न्यायालयाने या दोघांना १९ एप्रिलपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे.
क्यूआर कोडमुळे प्रकार उघड
शेख व घुले याने प्रती कामगार ६५० रुपये प्रमाणे कंपनीकडून ८६ हजार ४५० रुपये घेतले होते. मात्र कामगारांचे नमुने थायरो केअर मध्ये न पाठवता शेख याने स्वतः संगणकावर बनावट निगेटिव्ह रिपोर्ट बनवून ते कंपनीला दिले. मात्र सर्वच कामगारांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याने व सर्वांवर एकच क्यू आर कोड असल्याने कंपनीला संशय आल्याने केलेल्या चौकशीत हा प्रकार उघड झाला. या दोघांनी इतरही अनेकांना बनावट निगेटिव्ह रिपोर्ट दिल्याची शक्यता आहे.