Coronavirus : शाहीन बागेतील आंदोलकांना कोरोनाचीही नाही भीती; आंदोलन मागे घेण्यास नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 05:37 PM2020-03-17T17:37:21+5:302020-03-17T17:42:29+5:30
Coronavirus : आंदोलक अजूनपर्यंत तरी त्यांच्या विनंतीला जुमानत असल्याची माहिती एएनआयने दिली आहे.
नवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने लग्न समारंभांसह एकावेळी ५० लोक एकत्र जमण्यावर देखील ३१ मार्चपर्यंत बंदी घातली आहे. या कालावधीत जीम, नाईटक्लब, थिएटर, स्पा सेंटर आणि आठवडे बाजार बंद राहणार आहेत. याचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध महामारी अधिनियमानुसार दोन वर्षे कारावास आणि दंड होऊ शकतो. हा नियम शाहीन बागेतील आंदोलकांवर देखील लागू होणार आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे CAA विरोधातील आंदोलन मागे घेण्यासाठी रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन सदस्य आणि पोलीस हे शाहीन बागेतील आंदोलकांशी संवाद साधत आहेत. मात्र, आंदोलक अजूनपर्यंत तरी त्यांच्या विनंतीला जुमानत असल्याची माहिती एएनआयने दिली आहे.
आज सकाळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात झालेल्या उच्च स्तरीय बैठक पार पडली. या बैठकीला संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. केजरीवाल म्हणाले की, सामाजिक, धार्मिक, संस्कृतिक आणि राजकीयसह आंदोलनासाठी ५० हून अधिक लोक एकत्र येऊ शकणार नाहीत. याआधी ही संख्या २०० होती. सध्या सरकारच्या अधिनियमातून लग्न समारंभ वगळण्यात आले आहे. मात्र जीम, नाईटक्लब, स्पा, आठवडे बाजार ३१ मार्चपर्यंत बंद राहतील. आवश्यकता भासल्यास यावर पुन्हा निर्णय घेण्यात येईल, असंही केजरीवाल म्हणाले होते.
CAA विरुद्ध शाहीन बाग येथील आंदोलनासंदर्भात केजरीवाल यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर केजरीवाल म्हणाले की, ५० हून अधिक लोक जमणाऱ्या सर्व कार्यक्रमांवर बंदी आहे. कोणी हे मान्य केल नाही तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. कोरोना व्हायरस रोखण्यास दिल्ली सरकार प्राधान्य देत असल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले होते.
Delhi: Resident Welfare Association members and Police talk to the protesters at Shaheen Bagh, requesting them to call off their protest in the light of #CoronavirusOutbreak. The protesters have not agreed to the request yet. pic.twitter.com/VLSLtTGojz
— ANI (@ANI) March 17, 2020