मुंबई - सीएसएमटी येथील जीटी रुग्णालयातून कोरोनाग्रस्त रुग्ण पळाला असून आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णाचा शोध सुरु आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आझाद मैदान पोलीस ठाण्यात साथरोग प्रतिबंधक कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यामध्ये आज दिवसभरात १२०० नवे रुग्ण सापडले असताना नुकताच मुंबईचा आकडा आला आहे. मुंबईत आज ७५९ नवे रुग्ण सापडले आहेत. हा आकडा कालपर्यंतच एकूण राज्याचा होता. आज एकट्या मुंबईतच ही मोठी वाढ झाली आहे. तर उर्वरित राज्यामध्येही मोठी वाढ नोंदविली गेली आहे.
राज्यात आतापर्यंतचे सर्वाधिक १२३३ रूग्णांचे निदान झाले असून एकूण रुग्णसंख्या १६, ७५८ वर पोहोचली आहे. तर ३४ मृत्यूंची नोंद झाली असून एकूण ६५१ बळी गेले आहेत. आज २७५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण ३०९४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.