त्रिभुवनदास भीमजी जव्हेरीच्या संचालकांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 10:51 PM2020-01-13T22:51:18+5:302020-01-13T22:53:05+5:30
दोन ग्राहकांचे २० लाख रुपये हडपल्याप्रकरणी प्रसिद्ध त्रिभुवनदास भीमजी जव्हेरी(टीबीझेड)च्या दोन संचालकांविरुद्ध सदर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या घडामोडीमुळे नागपूरच्या सराफा वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन ग्राहकांचे २० लाख रुपये हडपल्याप्रकरणी प्रसिद्ध त्रिभुवनदास भीमजी जव्हेरी(टीबीझेड)च्या दोन संचालकांविरुद्ध सदर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या घडामोडीमुळे नागपूरच्या सराफा वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
हेमंत जव्हेरी (वय ५८, रा. ए. के. अहिर मार्ग, दूरदर्शन वरळी, मुंबई) आणि सागर जव्हेरी (वय ३४, रा. टीबीझेड अॅण्ड सन्स प्रा. लि. अॅम्बेन्सी अपार्टमेंट, मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्या संचालकांची नावे आहेत.
सदर छावणीमध्ये टीबीझेडची शाखा (शोरूम) आहे. आठ वर्षांपूर्वी टीबीझेडने गुंतवणुकीवर ग्राहकांना प्रति महिना १.५ टक्के दराची एक विशेष योजना सुरू केली होती. वेकोलितून निवृत्त झालेले आणि सध्या जरीपटक्यात राहणारे उत्तंगराव मारोतराव भोजापाई (वय ६०) यांनी या योजनेत २३ लाख रुपये तसेच त्यांचे मित्र प्रशांतकुमार टायटस यांनी २५ लाख रुपये टीबीझेडकडे गुंतविले होते. ५ सप्टेंबर २०१२ ते ५ सप्टेंबर २०२१ या कालावधीसाठी ही योजना होती. ठरल्याप्रमाणे भोजापाई आणि टायटस यांना जव्हेरी अॅण्ड सन्समधून सुरुवातीला १.५ टक्के दराने प्रतिमाह व्याज मिळत होते. मात्र, २०१६ नंतर टीबीझेडकडून योजनेचा गाशा गुंडाळला गेला. व्याज देणे बंद झाल्याने भोजापाई आणि टायटस यांनी टीबीझेडमध्ये जाऊन आपली रक्कम परत मागितली. प्रारंभी मौनीबाबांची भूमिका वठविल्यानंतर बरेच आढेवेढे घेत त्यांना टीबीझेडच्या संचालकांनी प्रत्येकी १३ आणि १५ लाख रुपये परत केले. मात्र, दोघांचेही प्रत्येकी १० लाख रुपये शिल्लक होते. ते देण्यास फर्मचे संचालक वेगवेगळे कारण सांगून रक्कम परत करण्यासाठी टाळाटाळ करू लागले. त्यामुळे या दोघांनी सप्टेंबर २०१९ मध्ये सदर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रारीची प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर सोमवारी याप्रकरणी त्रिभुवनदास भीमजी जव्हेरी(टीबीझेड)चे संचालक हेमंत जव्हेरी आणि सागर जव्हेरी या दोन संचालकांंविरुद्ध फसवणुकीचे कलम ४०६, ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. या घडामोडीमुळे नागपूरच्या सराफा वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
यापूर्वीही असेच घडले होते !
टीबीझेडच्या संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल होण्याची ही दुसरी वेळ आहे. दोन वर्षांपूर्वी तेथे अशीच फसवणूक झाल्याची चौघांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. ते कसेबसे सेटल करण्यात आले. आता पोलिसांनी कारवाईची तयारी चालविली आहे. लवकरच जव्हेरी यांना अटक करण्यासाठी सदर पोलिसांचे पथक मुंबईला जाणार असल्याची माहिती सदरचे ठाणेदार महेश बनसोडे यांनी लोकमतशी बोलताना दिली.