- रणजीत इंगळे
ठाणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते , माजी मंत्री आ. डाॅ.जितेंद्र आव्हाड यांचे अर्धनग्न छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारीत करणाऱ्या अनंत करमुसे याच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात करमुसे याने तपासकामात कोणत्याही प्रकारचे साह्य केले नसल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला असून त्याने दाखल केलेली याचिकाही स्वच्छ हेतूने केली नसल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले आहे. करमुसे याचे ट्वीट आणि फेसबुक पोस्ट हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेबाहेर असल्याचेही न्यायालयाने नमूद केले आहे.
अनंत करमुसे याने डाॅ.जितेंद्र आव्हाड यांचे अर्धनग्न अवस्थेतील माॅर्फ केलेले छायाचित्र त्याने समाजमाध्यमांवर प्रसारीत केले होते. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी 6 एप्रिल 2020 रोजी भादंवि 292, 500 तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या कलम 66 (ई) अन्वये गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्य़ातील दोषारोपपत्र ठाणे न्यायालयात दाखल करण्यात आहे. तसेच अनंत करमुसे याला समन्सपत्र बजावण्यात आले आहे.
या आरोपपत्रामध्ये पोलिसांनी करमुसे याच्या वर्तणुकीवर ताशेरे ओढले आहेत. करमुसे याच्या जप्त केलेल्या फोनमध्ये डाॅ.जितेंद्र आव्हाड यांचे अर्धनग्न छायाचित्र सापडले होते. मात्र, असे असतानाही करमुसे याने पोलिसांना तपासात कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नसल्याचे या आरोपत्रात नमूद करण्यात आले आहे. आरोपी करमुसे याने स्वतःच्या मोबाईल फोनमधुन स्वतः चे फेसबुक अकाउंटवरून डाॅ.जितेंद्र आव्हाड यांचा एडीट केलेला अर्धनग्न अवस्थेतील अश्लिल फोटो अपलोड करून प्रसिद्ध केला असल्याने सदरचा मोबाईल फोन जप्त करून फोरेन्सिक लॅबमध्ये पाठविला असता, जातीद्वेष-धर्मद्वेष, व्यक्तीद्वेष आदी 27 प्रकारचे द्वेष पसरविणार्या पोस्ट करमुसे याने आपल्या वैयक्तिक अकाउंटवरून फेसबुक व ट्विटरवर अपलोड केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
पाच वर्षे अनंत करमुसे हा डाॅ.जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य करीत असून त्याला या कामी अन्य कोण साह्य करीत आहे का? याचा शोध घेण्यासाठी अनंत करमुसे यास सुमारे 5 वेळा समजपत्र पाठवूनही त्याने पोलिसांना सहकार्य केले नसल्याचेही या दोषारोपपत्रात पोलिसांनी नमूद केले आहे. तर, करमुसे याच्या ट्वीटमध्ये जातीद्वेष, धर्मद्वेष दिसत असून शरद पवार यांचा शरदद्दीन आणि जितेंद्र आव्हाड यांचा जितुद्दीन असा उल्लेख असलेले छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारीत केले होते. हे सर्व पुरावे पोलिसांनी आरोपपत्रात नमूद केले आहेत.
पोलिसांनी दाखल केलेल्या या आरोपत्रात करमुसे याने केलेल्या सर्व गुन्ह्यांचा, जातीद्वेष-धर्मद्वेष पसरविण्याच्या कृत्याचा पाढाच वाचण्यात आला आहे. त्याने केलेले हे गुन्हे दडविण्यासाठीचा त्याचा प्रयत्न आता या दोषारोपपत्रामुळे उघडा पडला आहे. खोटी सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन करमुसे याने आपले गुन्हे दडविण्याचा प्रयत्न केला होता. पण, आता प्रथमच त्याचा बुरखा पूर्णपणे फाटला आहे.
दरम्यान, यापूर्वी करमुसे यानेच दाखल केलेल्या याचिकेवर दिलेल्या निकालात उच्च न्यायालयाने अनंत करमुसे याच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. तसेच, आपल्याविरोधात विकृत ट्वीट्सबद्दल गुन्हा दाखल आहे, ही बाब तसेच आपले विकृत ट्विट्स याची माहिती याचिका दाखल करताना उच्च न्यायालयापासून लपवून ठेवल्याबाबतही उच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. सन 2016 पासून करमुसे हा डाॅ.जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य करीत होता. सन 2018 मध्ये डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी करमुसे याला ब्लॉक केले होते. डाॅ.जितेंद्र आव्हाड हे करमुसे याला प्रतिसाद देत नसतानाही किंवा करमुसे याला ब्लॉक केले असतानाही करमुसे याने, "डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी मला ब्लॉक केले आहे. मी आपणाला आवाहन करतो की त्यांना वेगळ्या माध्यमातून लक्ष्य करावे," असे आवाहनही करमुसे याने आपल्या ट्वीटर अकाउंटवरून 12 जुलै 2018 रोजी केले असल्याचे पोलिसांनी आपल्या तपासादरम्यान शोधले आहे. हे सर्व ट्विट्स उच्च न्यायालयात जेव्हा मांडण्यात आले तेव्हा, ही माहिती करमुसे याने दडवून ठेवली असल्याने . याचिकाकर्त्याचा हेतू स्वच्छ आणि प्रामाणिक नसल्याचे निरीक्षणही आपल्या निकालपत्रातील परिच्छेद क्रमांक 27 आणि 28 मध्ये उच्च न्यायालयाने नमूद केले आहे. विशेष म्हणजे, डाॅ. आव्हाड यांचे अर्धनग्न छायाचित्र न्यायालयासमोर आल्यानंतर " हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का? " असा प्रश्न विचारत माणूस सुशिक्षित असू शकतो. पण, सुसंस्कृत नाही, अशी गंभीर टिप्पणी करीत सदरचे छायाचित्र न्यायाधीशांनी बाजूला ठेवले आहे.
आव्हाडांना ठार मारण्याचा कट?अनंत करमुसे हा ज्या संघटनेचा ठाणे अध्यक्ष म्हणून कार्यरत होता. त्याच संघटनेचा सदस्य अविनाश पवार याने जितेंद्र आव्हाड यांच्या घराची रेकी केली होती. तसेच त्याच संघटनेचा सदस्य असलेल्या शाश्वत नावाच्या एका इसमाने आपल्या ट्वीटर हँडलरवरून डाॅ.जितेंद्र आव्हाड यांना "काही मंडळी तुमची वाट पहात आहे. बाहेर निघू नका" अशी धमकी दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात आव्हाड यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचे स्पष्ट झाल्याने अविनाश पवार याला अटक करण्यात आली असून सध्या तो ऑर्थर रोड कारागृहात आहे.