मुंबई - महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत फेसबुकवरून आक्षेपार्ह टिप्पणी केल्या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रँच युनिटने मंगळवारी ही कारवाई केली आहे. ठाण्यातील रहिवासी असलेल्या एका महिलेने ओळख लपवण्यासाठी अनेक फेक प्रोफाईल बनवल्या होत्या. मात्र पोलिसांनी तिची ओळख पटवली आणि तिला अटक केली. या महिलेविरोधात भादंविमधील अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी मंगळवारी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव स्मृती पांचाळ आहे. ती गेल्या दोन वर्षांपासून अमृता फडणवीस यांच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर अनेक बनावट अकाऊंटवर आक्षेपार्ह कमेंट्स करत होती. एका अधिकाऱ्याने सांगितले की, पांचाळ हिने कथितपणे ५३ बनावट फेसबूक आयडी आणि १३ जीमेल अकाऊंट्स बनवले होते.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपी महिलेला मंगळवारी कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते. कोर्टाने महिलेला १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीमध्ये पाठवण्यात आले आहे. पोलीस तिच्या इराद्यांचा तपास करत आहेत. आरोपी महिलेविरोधात पोलिसांनी भादंवि कलम ४१९, ४६८ आणि आयटीच्या अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.