ठाणे: मोठया परताव्याच्या अमिषाने ठाणे, कल्याण तसेच मुंबईतील गुंतवणूकदारांची २२ ते २३ कोटींची फसवणूक करणाऱ्या आदित्य रेडीज या सूत्रधार संचालकाला अटक करण्यात आली. ठाणे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुनिल लोखंडे यांनी शुक्रवारी यासंदर्भातील माहिती दिली. त्याला ३१ जानेवारीर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश कल्याण न्यायालयाने दिले आहेत.
कल्याणच्या खडकपाडा येथील रहिवाशी रेखा झोपे (५७) यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे विष्णूनगर पोलीस ठाण्यात फसवणूकीसह महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थेच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ च्या कलमानुसार ३० नोव्हेंबर २०२० रोजी गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. या प्रकरणात अरुण गांधी (७५) या पहिल्या आरोपीला एक महिन्यांपूर्वी पोलिसांनी अटक केली होती.
यातील मुख्य आरोपी आदित्य रेडीज तसेच त्याचे वडील हेमंत आणि आई मानसी हे हा गुन्हा दाखल झाल्यापासून भूमीगत झाले होते. ते बदलापूर परिसरात असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त अरविंद वाढणकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक समीर शेख यांच्या पथकाने २४ जानेवारी २०२२ रोजी बदलापूर भागात सापळा रचून आदित्य याला अटक केली.
यापूर्वी अटक केलेला अरुण गांधी आणि आदित्य यांनी आपसात संगनमत करून संपर्क अॅग्रो मल्टी स्टेट को ऑपरेटीव्ह सोसायटी लिमिटेड (आधीचे नाव कालीकाई अॅग्रो मल्टी स्टेट सोसायटी) कंपनी सुरू करून तक्रारदार तसेच इतरांना कमी कालावधीत चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेगवेगळ्या ठेवीपोटी मोठया प्रमाणात रक्कम स्वीकारली. त्यांना कोणतीही रक्कम परत न करता, त्या रक्कमेचा अपहार करून सुरुवातीला ३५ लाख ३८ हजार ३५० रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आहे. मात्र, यात सुमारे दहा हजार गुंतवणूकदारांची २२ ते २३ कोटींची आर्थिक फसवणूक झाल्याची बाब चौकशीत समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली.