कल्याण - ४० लाखांसाठी एका ९ वर्षांच्या मुलाला अपहरण करणाऱ्या चार जणांना पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे बेडय़ा ठोकल्या आहेत. मुलाची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी हे दुसरे तिसरे कोणी नसून मुलाच्या वडिलांचे मित्रच निघाले आहेत. मुलाचा जीव वाचल्याने त्याच्या आई वडिलांचा जीव भांड्यात पडला आहे.
अंबरनाथच्या ग्रीन सिटी पार्कमध्ये राहणारे सोनू सरिता हे वडापावचा व्यवसाय करतात. त्यांचा मुलगा कृष्णा हा ८ सप्टेंबरच्या सायंकाळी टय़ूशनला गेला. तो परतला नाही. त्याच्या आई वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान मुलाचे चुलते सत्येंद्र यांना फोन आला की, मुलगा आमच्याकडे आहे. आम्ही त्याचे अपहरण केले आहे. ४० लाख रुपये आणून द्या तेव्हाच मुलाला तुमच्या ताब्यात देऊ. पोलिसांनी सर्व यंत्रणा कामाला लावली. ठाणे, कल्याण, उल्हासनगर क्राईम ब्रांचसह अंबरनाथ पोलिस मुलाचा शोध घेऊ लागले. अपहरणकत्र्याचा पुन्हा फोन आला. पोलिसांनी अधिक तपास केला. तेव्हा पोलिसांच्या हाती एक सीसीटीव्ही फुटेज हाती लागले. सीसीटीव्हीत आरोपी मुलाला घेऊन जात असल्याचे दिसून आले. आरोपी हे मुलाच्या वडिलांच्या ओळखीचे होते.
पोलिसांनी कल्याणनजीकच्या मोहने परिसरातून आरोपी छोटू सिंग, अमजद खान, योगश सिंग आणि अन्य एक जण अशा चौघांना अटक केली आहे. त्यांच्या तावडीतून मुलाची सुटका केली आहे. हे आरोपी दुसरे तिसरे कोणी नसून ते मुलाच्या वडिलांचे मित्र होते. त्यांनी कृष्णाचे अपहरण केले होते. मुलाचे वडील आजारी असून रुग्णालयात उपचार घेत असल्याची बतावणी करुन मुलाला हे घेऊन गेले. मुलगा त्यांना ओळखत असल्याने मुलाला काही वाटले नाही. मानसिक ताणही आला नाही. आरोपी मुलाला त्रस देत नव्हते.मात्र त्यांचे बिंग अखेरीस फुटले. ठाणे गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली. पालकांनी पोलिसांच्या कामगिरीचे अभिनंदन केले आहे.