लखनौ - उत्तर प्रदेशमधील ललीतपूर जिल्ह्यात पोलिसांनी केलेल्या अत्याचाराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महरौनी पोलीस ठाण्यामध्ये तैनात असलेला पोलीस कर्मचारी आणि एका महिला पोलीस अधिकाऱ्याने एका महिलेला खोलीत बंद करून तिला थर्ड डिग्री दिली. चोरी केल्याच्या संशयाखाली या महिलेला पकडून दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला निर्वस्त्र केले. तसेच तिला बेल्टने मारहाण केली. गुन्हा कबूल करावा यासाठी तिच्यावर करंटसोबत पाण्याचा मारा करण्यात आला. तसेच हे प्रकरण वाढू नये यासाठी पीडितेला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तिथे पती-पत्नीदरम्यानचा वाद असल्याचे सांगून शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली महिलेच्या आजारी पतीसह तिच्याविरोधातच कारवाई करण्यात आली.
त्यानंतर गुरुवारी सदर पीडिया आपल्या नातेवाईकांसह गाडीमध्ये झोपून एसपी कार्यालयामध्ये पोहोचली. तसेच तिने डीआयजींना संपूर्ण घटनाक्रम सांगून आरोपी पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. सदर महिलेने पोलीस अधीक्षकांना दिलेल्या पत्रात सांगितले की, मी महरौनी पोलीस ठाण्यामध्ये तैनास पोलीस कर्मचारी अंशू पटेल यांच्या घरी जेवण बनवण्याचे आणि साफसफाईचे काम करते. २ मे रोजी जेवण बनवल्यानंतर मी घरी गेली. संध्याकाळी मी पुन्हा जेवण बनवण्यासाठी पोहोचले तेव्हा अंशू पटेल यांच्या पत्नीने घरात बसवून दरवाजा बंद केला. त्यानंतर फोन करून पतीला बोलावून घेतले. अंशू पटेल हे त्यांच्यासोबत महिला पोलीस पारुल चंदेल यांनाही सोबत घेऊन आले. तसेच माझ्याकडे चोरीबाबत विचारणा केली. त्यानंतर अंशू आणि या महिला कर्मचाऱ्यांनी रात्री ८ वाजल्यापासून वीजपुरवठा बंद करून माझ्यावर पाण्याचा फवारा मारला. त्यानंतर निर्वस्त्र करून बेल्टने मला मारहाण केली. मारहाण सुरू असताना मी त्यांच्याकडे मला सोडण्याची विनंती केली. मात्र ते ऐकले नाहीत. त्या दोघांनीही मला बेल्टने मारहाण केली.
दरम्यान, या संदर्भातील वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाल्यानंतर आरोपी पोलीस कर्मचारी अंशू पटेल, त्यांची पत्नी आणि महिला सब इन्स्पेक्टर पारुल चंदेल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षकांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली आहे.