नवी दिल्ली - देशात महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. जर्मनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी करत असलेल्या एका व्यक्तीच्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं आहे. सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे. पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचं कळाल्यामुळे महिलेला मोठा धक्का बसला होता. त्यात सासरची मंडळींही तिला सतत त्रास देत होती. या त्रासातून तिने धक्कादायक पाऊल उचललं. आत्महत्ये आधी तिने 6 पानी सुसाईड नोट लिहिली आहे.
विवाहिता अजमेरमध्ये राहत होती. तिला दोन वर्षांची एक मुलगी आहे. महिलेने सुसाईड नोटमध्ये "बाबा माझ्यामुळे तुम्हाला आता कोणासमोरही झुकावं लागणार नाही. यासाठी मी स्वत:ला संपवत आहे. माझ्या दोन वर्षांच्या मुलीची हत्या करण्याचं धैर्य माझ्यात नव्हतं, म्हणून हिची काळजी घ्या" असं म्हटलं आहे. तीन वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं होतं. तिची पती जर्मनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. पतीवर विवाहबाह्य संबंधासह सासरच्या मंडळींकडून शोषण केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.
कुटुंबीय घरी परतले तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या वैशालीनगरमधील शिव सागर कॉलनीत राहणारे मधुसूदन सोमानी यांची मुलगी अनुराधा (31) हिने शनिवारी गळफास घेऊ आत्महत्या केली. यावेळी घरात आई-वडील आणि भाऊ नव्हते. केवळ दोन वर्षांची मुलगी अनन्या होती. कुटुंबातील सदस्य घरी पोहोचले तेव्हा ती लटकलेल्या अवस्थेत दिसली. यानंतर पोलिसांना सूचना देण्यात आली. शनिवारी रात्री अनुराधा आपल्या दोन वर्षांची मुलगी अनन्यासह घरात एकटी होती. तिचे आई-वडील मुलीच्या सासरी सुरू असलेले प्रश्न सोडवण्यासाठी समाजातील लोकांना, नातेवाईकांना भेटायला गेले होते. कुटुंबीय घरी परतले तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला.
सासरची मंडळी द्यायचे शारीरीक आणि मानसिक त्रास
अनुराधाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, पती अनिरूद्ध तिला सासरी सोडून जर्मनीला निघून गेला होता. दोघे तीन वर्षात केवळ 6 महिने एकत्र राहिले. सासरी तिचे सासू-सासरे आणि दिर शारीरीक आणि मानसिक त्रास देत होते. तिला जेवायला देखील देत नसत. सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून अनुराधा माहेरी निघून आली होती. पण ती नेहमीच तणावात असायची. यातूनच तिने स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.