नवी दिल्ली - हरियाणाच्या सोनीपतमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त झालं आहे. पती-पत्नीने टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. यामुळे 2 वर्षांची लेक आता एकटीच राहिली असून ती अनाथ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोनीपतमधील कुंडली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवपुरी कॉलनीत ही धक्कादायक घटना घडली आहे. एका दाम्पत्याने आपल्या राहत्या घरामध्ये पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
कुंडली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 30 वर्षीय अमन आणि त्याची पत्नी पलेन्द्री देवी एका भाड्याच्या घरामध्ये राहत होते. काही कारणास्तव त्यांनी आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला. अमन प्लंबरचं काम करतो. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना एक दोन वर्षांची मुलगी देखील आहे. पोलिसांनी दाम्पत्याच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली आहे. या भयंकर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
तपास अधिकारी रणबीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना फोनवर याबाबत सूचना मिळाली. एका दाम्पत्याने आत्महत्या केल्याचं समजलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा त्यांना पती पत्नी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसले. पोलीस या प्रकरणी अनेकांची चौकशी करत असून आत्महत्ये मागचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यानंतर रिपोर्टमधूनच याबाबत खुलासा होईल असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.