Crime News: सीए बलात्कार प्रकरणी महिलेवरही होता गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 09:53 AM2023-02-01T09:53:27+5:302023-02-01T10:00:03+5:30
Crime News: मागील वर्षी जानेवारी महिन्यात चिराग वरैया यांच्यासह तीन जणांची फसवणूक केल्याप्रकरणी बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेविरोधात मुलुंड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.
मुंबई : मागील वर्षी जानेवारी महिन्यात चिराग वरैया यांच्यासह तीन जणांची फसवणूक केल्याप्रकरणी बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेविरोधात मुलुंड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये चिराग यांची ९३ लाखांना फसवणूक झाली होती. या गुन्ह्यात महिलेला अटकही करण्यात आली होती.
याच गुन्ह्यानंतर महिलेने बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केल्याचे सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. भांडूपमध्ये दाखल बलात्काराच्या गुन्ह्यात महिलेने केलेल्या आरोपात १३ नोव्हेंबर २०२० पासून चिराग यांनी महिलेच्या खोट्या स्वाक्षरीचे बनावट कागदपत्र तयार करून खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच अश्लील फोटो काढून समाजात बदनामी करण्याची धमकी दिल्याप्रकरणी तक्रार दिली होती. त्यानुसार, पोलिसांनी १० जानेवारीला चिराग यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
दबाव नेमका कुणाचा?
मृतदेहावरून त्यांनी रविवारीच आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. २६ जानेवारी रोजी ते भांडूप पोलिस ठाण्यात चौकशीला हजर झाले होते. मात्र, तेथे प्रकृती खालावल्याने त्यांना दुसऱ्या दिवशी बोलाविले. मात्र, ते गेले नाही. यामध्ये त्यांना पोलिसांकडून अटकेसाठी काही दबाव आणला होता का? तसेच वकिलाकडून नेमकी काय माहिती मिळाली? त्या दिवशी नेमके काय झाले? त्यांना अखेरचे कुणासोबत बोलणे झाले? याबाबत इगतपुरी पोलिस तपास करीत आहेत.
सुसाईड नोटमध्ये काय?
बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आले आहे. समाजात झालेली बदनामी सहन करू शकत नाही. तसेच यामध्ये तक्रारदार महिलेकडून झालेल्या १ कोटीच्या फसवणुकीचाही उल्लेख केला आहे. पत्नीला सोडून जायचे नाही. मात्र, हे सत्य पटवून सांगण्याची ताकद नाही. कुटुंबीयांनी काळजी घ्यावी. कुटुंबीयांच्या काळजीपोटी भावनिक दोन पानी लिहिलेले पत्र पोलिसांच्या हाती लागले आहे. या पत्राच्या आधारे इगतपुरी पोलिस अधिक तपास करीत आहे.