इंदापूर : तालुक्यातील परप्रांतीय डाळिंब व्यापाऱ्याचे अपहरण करून त्यांना मारहाण करून, त्याच्याकडून २० लाख रुपये खंडणी घेऊन त्यांना कोल्हापूर येथे सोडणारा मुख्य सूत्रधार डाळिंब व्यापारी व त्याचा एक साथीदार याला इंदापूर पोलिसांनी अटक केली. आरोपींना १० दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.दि. २४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुत्तन जॉर्ज (रा. कट्टायम, केरळ) यांनी त्यांचे जावई एडिसन मैथ्यू (डाळिंब व्यापारी) बेपत्ता असल्याबाबत तक्रार दिली होती.२६ फेब्रुवारीला एडिसन मैथ्यू यांनी स्वत: त्यांच्या सात जणांनी अपहरण केल्याची तक्रार दिली. निमगाव केतकी ते इंदापूर रोडवरील वेताळबाबा मंदिराजवळ त्यांच्या गाडीला हात करून, थांबवून, अनोळखी ७ लोकांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्या दुसºया गाडीतून नेत त्यांचे अपहरण केले होते. त्यांच्याकडे २० लाख रुपयांची खंडणी मागितली आणि दुसºया दिवशी २०० रुपये देत त्यांना मारहाण करून आरोपींनी सोडून दिले. त्यांच्या तक्रारीनंतर सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकार यांनी गुन्ह्यासंदर्भात मार्गदर्शन करून तत्काळ आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना केल्या. त्याप्रमाणे इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राम गोमारे व त्यांच्या पथकाने तपासाचे चक्र फिरवून जलद हालचाली करून कारवाई केली. या प्रकरणातील आरोपी सौरभ बाळू तरंगे (वय २०, रा. बळपुडी, ता. इंदापूर) आणि राहुल दत्तू गडदे (वय २८, रा. डोंबावाडी, जि. सोलापूर) या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी सौरभ बाळू तरंगे व राहुल दत्तू गडदे या दोघांना बुधवारी (दि. १३) रात्री अटक केली असून त्यांना इंदापूर फौजदारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना २३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
डाळिंब व्यापाऱ्याचे अपहरण करणारे गुन्हेगार गजाआड, २० लाखांची मागितली होती खंडणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 1:15 AM