बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यासह चौघांविरुद्ध गुन्हे दाखल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 02:12 PM2018-07-04T14:12:27+5:302018-07-04T14:15:29+5:30
सनाच्या १७ लाख ८९ हजार ५३८ रुपये निधीचा अपहार केल्याची तक्रार कनिष्ठ प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, वाशिम यांनी येथील पोलीस स्टेशनला २ जुलै रोजी दाखल केली. त्यावरून कार्यकारी अभियंता यांच्यासह मंगरूळपीरचे उपकार्यकारी अभियंता, शाखा अभियंता व शासकीय कंत्राटदार अशा चौघांविरुद्ध मंगळवार, ३ जुलै रोजी गुन्हे दाखल करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरूळपीर : येथील न्यायालयीन इमारत बांधकामात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यासह संबंधित इतर अधिकारी व कंत्राटदारांनी संगनमत करून शासनाच्या १७ लाख ८९ हजार ५३८ रुपये निधीचा अपहार केल्याची तक्रार कनिष्ठ प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, वाशिम यांनी येथील पोलीस स्टेशनला २ जुलै रोजी दाखल केली. त्यावरून कार्यकारी अभियंता यांच्यासह मंगरूळपीरचे उपकार्यकारी अभियंता, शाखा अभियंता व शासकीय कंत्राटदार अशा चौघांविरुद्ध मंगळवार, ३ जुलै रोजी गुन्हे दाखल करण्यात आले.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कनिष्ठ प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे, की सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता के .आर. गाडेकर, उपकार्यकारी अभियंता दिनकर नागे, शाखा अभियंता विजय पाटील आणि शासकीय कंत्राटदार समाधान भगत (रा. सनगाव, ता. मंगरूळपीर) यांनी ६ जून २०१८ पूर्वी संगनमत करून मंगरूळपीर येथील न्यायालयीन इमारतीचे कुठलेही बांधकाम न करता १७ लाख ८९ हजार ५३८ रुपयांचा अपहार केला. अशा आशयाच्या तक्रारीवरून पोलिसांनी कार्यकारी अभियंता गाडेकरसह नमूद आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ४०६, ५०९, ४१७, ४६८, ३४ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे करीत आहेत.