- नरेश डोंगरेनागपूर : दोन दशकापूर्वी अभिनेता अभिषेक बच्चन आणि करिना कपूर यांना लॉन्च करणारा रिफ्यूजी हा सिनेमा प्रदर्शित झाला. भारतातून पाकिस्तान आणि पाकिस्तानातून भारतात कशी घुसखोरी केली जाते, त्याचे चित्रण या सिनेमात दाखविण्यात आले होते. सोबतच दोन वेगवेगळ्या देशातील प्रेमीयुगुलाची होत असलेली घुसमटही या सिनेमात सुरेखपणे मांडण्यात आली होती. त्यांची घुसमट आणि अगतिकता ''पंछी, नदिया.. पवन के झोके... कोई सरहद ना इन्हे रोंके..'' या गीतातून अप्रतिमपणे दाखविण्यात आली होती. अर्थ असा की, पक्षी, नद्या आणि हवेची झुळूक मुक्त संचार करते. माणसाला मात्र सीमा (सरहद) असतात. त्या सीमा माणसाला अडवून धरतात. हे खरेही आहे. सध्या अवघ्या जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोनाने जागोजागी पाय पसरू नये म्हणून जिल्ह्याजिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली. मात्र, अत्यावश्यक कामानिमित्त एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायचे असेल तर त्यासाठी रीतसर पोलिसांची ई पास घ्यावी लागते. त्यासाठी सबळ कारण आणि पुरावाही द्यावा लागतो. मात्र, हे सर्व सर्वसामान्य माणसासाठी आहे, गुन्हेगारांना कसलीही पास लागत नाही किंवा पुरावाही द्यावा लागत नाही. ते बिनधोकपणे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात आणि दुसऱ्या जिल्ह्यातून तिसरा जिल्ह्यात जातात. परतही येतात. गेल्या महिनाभरात नागपुरात घडलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींनी तर कमालच केली. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात नव्हे तर ते एका प्रांतातून थेट दुसऱ्या प्रांतातही जाऊन आले. त्यामुळे आता'पंछी, नदिया, पवन के झोके और अपराधी... कोई सरहद ना इन्हे रोंके... ! असे नवीन गाणे तयार करण्याची वेळ आली आहे.या निमित्ताने दुसरा महत्त्वाचा तेवढाच गंभीर पैलूही उघड झाला आहे. सरकारने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात नाका-बंदी लावून एका जिल्ह्यातील दुसऱ्या व्यक्तीला दुसऱ्या जिल्ह्यात शिरू द्यायचे नाही, असा निर्णय घेतला. मात्र, सरकारच्या या हेतूला पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे हरताळ फासला जात असल्याचे अधोरेखित झाले आहे.अपहरण आणि खंडणी वसुली सारख्या अनेक गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेला आंतरराज्य गुन्हेगार सिजो चंद्रण याने मेडिकल मधून पोलिसाच्या कस्टडीतून पलायन केले. कोणतेही वाहन नसताना तो पांढुर्णा इटारसी अर्थात मध्यप्रदेशातून थेट दिल्लीला (एका प्रांतातून, दुसऱ्या अन तिसऱ्या प्रांतात) पळून गेला. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीततील पेट्रोल पंपावर कुख्यात सागर बावरीने दरोडा घातला. तेथील एका कर्मचाऱ्याची हत्या केली आणि एक लाख रुपये लुटून तो गुजरातमध्ये पळून गेला.
अंबाझरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका सामूहिक बलात्काराच्या प्रकरणातील छोटू सुदामे आणि प्रितेश बीजवे हे आरोपी अमरावती जिल्ह्यात पळून गेले होते.
सनी जांगिड हत्याकांडातील आरोपी जाधव, रेवतकर आणि साथीदार नांदेड जिल्ह्यात पळून गेले आणि तेथून दुसऱ्या दिवशी नागपुरात परतही आले. कोणत्याही जिल्ह्यात कोणत्याही नाकेबंदीवर या गुन्हेगारांना रोखण्यात आले नाही, हे विशेष!