मुंबई : घराच्या दुरुस्तीसाठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकलेला आरे दुग्ध डेअरीचा मुख्य कार्यकारी अधिकारी नथू विठ्ठल राठोड (४२) याच्या घरातून ३ कोटी ४६ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या बेकायदा जमविलेल्या रकमेबाबत एसीबी अधिक तपास करत आहे.एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी घर दुरुस्तीसाठी राठोड याच्याकडे अर्ज करत भेट घेतली. राठोड याच्याकडे गोरेगाव दुग्ध वसाहत तथा उपायुक्त प्रशासन याचा अतिरिक्त कार्यभारही आहे. तेव्हा राठोड याने शिपाई अरविंद तिवारी यास भेटण्यास सांगितले. तिवारीने अर्जदाराकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे धाव घेतली. सोमवारी एसीबीने सापळा रचून तिवारीला रंगेहाथ पकडले. यात राठोडचा सहभाग स्पष्ट होताच, दोघांनाही अटक करण्यात आली. मंगळवारी एसीबीने राठोड याच्या घरी झाडाझडती घेतली. त्याच्या घरात ३ कोटी ४६ लाख रुपयांची रोकड आढळली आहे.राठोड याच्या नातेवाइकांच्या मालमत्तेबाबतही एसीबी तपास करत आहे. १४ मेपासून राठोड एसीबीच्या रडारवर होता. त्याने लाच मागितल्याचे स्पष्ट होताच, २४ मे रोजी एसीबीने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदार यांनी पैसे देण्याची तयारी दाखवताच, राठोड याने तक्रारदाराला गोरेगाव दुग्ध डेअरी येथील कार्यालयात तिवारीला भेटायला सांगितले. त्या वेळी लाचेची रक्कम स्वीकारण्यात आली.
२०१६ पासून आरेमध्ये कार्यरतनथू विठ्ठल राठोड हा २०१६ पासून आरेमध्येच कार्यरत होता. नियमानुसार तीन वर्षांनी बदली होणे अपेक्षित असतानाही त्याला बदली टाळण्यात यश मिळत होते, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.