क्रुर पोलीस बाप उठला पोटच्या मुलांच्या जिवावर; कोवळ्या शरीरावर चामडी पट्ट्याने ओढले आसूड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 03:07 PM2021-01-17T15:07:22+5:302021-01-17T15:13:12+5:30
कमरेला लावण्यासाठी वर्दीसोबत मिळणाऱ्या चामडी पट्टयाचे आसूड कोवळ्या जीवांच्या शरीरावर ओढताना या पित्याच्या निर्दयी मनाला पाझर कसा फुटला नाही? असा संतप्त प्रश्न जनसामान्यांकडून विचारला जात आहे.
नाशिक : शहरातील इगतपुरी तालुक्यातील तळेगावात राहणाऱ्या व पेशाने रेल्वे पोलीस असलेल्या एका बापाने आपल्या पोटच्या मुलांना दुसऱ्या पत्नीला हाताशी धरुन अमानुषपणे मारहाण करत क्रौर्याची सीमा ओलांडली. पोटच्या मुलांच्या जीवावर क्रुर पिता उठल्याने बापलेकाच्या नात्याला काळीमा फासली गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी इगतपुरी पोलिसांनी संशयित पित्यासह त्याच्या दुसऱ्या बायकोला बेड्या ठोकल्या आहेत.याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, इगतपुरी लोहमार्ग पोलीस कर्मचारी संशयित राहुल विजय मोरे हा तळेगाव येथील चंद्रभागा अपार्टमेंटमध्ये आपली दुसरी पत्नी मयुरी व पहिल्या पत्नीपासून जन्मलेला साहील (८) व प्रिया (५) यांच्यासोबत वास्तव्यास आहे. गेल्या महिनाभरापासून संशयित राहुला हा या दोन्ही चिमुकल्यांना मारझोड करत शारिरिक-मानसिक छळ करत होता; मात्र शुक्रवारपासून या क्रूर निर्दयी बापाने सगळी मर्यादा ओलांडून आपल्या पोटच्या फुलांसारख्या चिमुकल्यांना वर्दीच्या बेल्टने बेदम मारहाण करत जखमी केो. प्रियाचा चेहरा पुर्णपणे सुजला अन् डोळ्यांखाली जखमा झाल्या तर साहिलच्या पाठीवर बेल्टने मारल्याच्या खुणा सहज दिसून येतात. संपुर्ण पाठ त्याची लालभडक झाली आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून संशयित राहुल व त्याची दुसरी पत्नी मयुरीविरुध्द गुन्हा दाखल करत अटक केली आहे.या घटनेने संपुर्ण समाजमन हादरुन गेले असून नाशिक जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. आई-बाप पोटच्या मुलांच्या जीवावर कसे उठू शकतात? या विचाराने संवेदनशील माणसांची मने सुन्न झाली आहेत.
कमरेला लावण्यासाठी वर्दीसोबत मिळणाऱ्या चामडी पट्टयाचे आसूड कोवळ्या जीवांच्या शरीरावर ओढताना या पित्याच्या निर्दयी मनाला पाझर कसा फुटला नाही? असा संतप्त प्रश्न जनसामान्यांकडून विचारला जात आहे. या दोघा संशयितांविरुध्द तीव्र संतापाची लाट इगतपुरी तालुक्यासह संपुर्ण जिल्ह्यात पसरली आहे. मानवी ह्रदय हेलावून टाकणारी ही घटना अंगावर शहारे आणते.