मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या एका महिलेला कस्टम अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. कस्टम अधिकाऱ्यांनी तिच्या सामानातून तब्बल ४८१ ग्रॅम सोने जप्त केले आहे. चॉकलेटच्या वेष्टनातून लपवून या महिलेने दुबईहून हे सोनं आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
चॉकलेटच्या खोक्यातून ही महिला सोन्याची तस्करी करीत होती. विमानतळावरील तिच्या संशयास्पद हालचालीवरून कस्टम अधिकाऱ्यांनी तिला चौकशीला ताब्यात घेतले असता त्या महिलेच्या चेहऱ्यावर घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. त्यामुळे कस्टम अधिकाऱ्यांना दाट संशय आला. त्यानंतर तिच्या सामानाची झडती घेतल्यानंतर दुबईहून आणलेल्या चॉकलेटच्या कव्हरमध्ये सोनं आढळून आले. पोलिसांना संशय आला चॉकलेटच्या आवरणाला महिलेने सोन्याचे कोटिंग केलं होतं. तसेच हे सोनं स्कॅन मशीनमध्ये दिसू नये म्हणून त्याला कार्बन पेपरचे आवरण देखील लावण्यात आले होते. तपासानंतर कस्टम अधिकाऱ्यांनी ४८१ ग्रॅम सोनं जप्त करत महिलेला अटक केली आहे. विमानतळावर सोनं तस्करीची अनेक प्रकरणे उघडकीस आली असून वेगवेगळ्या शक्कला लढवून तस्कर वेगवेगळ्या मार्गाने सोन्याची तस्करी करताना दिसून आलं आहे.