- धीरज परब मीरारोड - एका महिलेस ऍप डाउनलोड करायला लावून त्या द्वारे मोबाईल हॅक करत तिच्या खात्यातून सायबर लुटारूंनी पैसे लुटल्याची घटना मीरारोड मध्ये घडली आहे . मीरारोडच्या शीतल नगर भागात राहणाऱ्या ५८ वर्षीय मारिया दांथी ह्यांना अनोळखी इसमाचा कॉल आला . ईएमआय भरायचा आहे का ? क्रेडिट कार्ड आहे का ? अशी विचारणा केल्यावर मारिया यांनी आपण ईएमआय बँकेच्या क्युआर कोड द्वारे ईएमआय भरते सांगितल्यावर त्या व्यक्तीने क्विक सपोर्ट ऍप डाउनलोड करून त्याद्वारे ईएमआय भरा असे सांगितले असता मारिया यांनी तो ऍप डाउनलोड केला . त्या व्यक्तीने पुन्हा कॉल करून मारिया यांना डेबिट कार्डचे फोटो काढायला सांगितले असता मारिया यांनी मोबाईल मधून फोटो काढले . काही वेळातच एका बँक खात्यातून १० हजार रुपये कमी झाले .
मारिया यांनी मीरारोडच्या सायबर शाखेत तक्रार देण्यासाठी जाई पर्यंत त्यांच्या दुसऱ्या बँक खात्यातून आणखी ६७ हजार रुपये काढले गेले . सायबर शाखेने तात्काळ हालचाल सुरु केली असता बँक खात्यातून गेलेले १० हजार रुपये वॉलेट मध्ये असल्याचे आढळले . तर काही रक्कम उत्तराखंडच्या हरिद्वार मधील विपीन सैनी व नाशिकच्या बागलाण येथील यश परदेशी च्या खात्यात गेले असल्याचे आढळून आले . या प्रकरणी मीरारोड पोलिसांनी तिघा आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे .