उल्हासनगरात पोलीस अधिकाऱ्याची दबंगगिरी; तरुणांची विनाकारण धुलाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 07:12 AM2022-01-03T07:12:20+5:302022-01-03T07:12:31+5:30
पोलीस उपायुक्त मोहिते यांनी हा प्रकार निंदनीय असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे तपास करून कारवाई करण्याचे संकेत दिले. जमावबंदी लागू असताना तरुण मध्यरात्री काय करीत होते, त्यांना घरी जाण्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगून उलट पोलिसाविरोधात शेरेबाजी करणे कितपत योग्य, असे प्रश्नही विचारले.
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : कॅम्प नं.- ३ शांतीनगर परिसरात नववर्षाचे स्वागत करणाऱ्या दोन तरुणांना गस्त घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने मारहाण केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस अधिक तपास करीत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली.
उल्हासनगर कॅम्प नं.-३ शांतीनगर स्मशानभूमी परिसरात नववर्षाच्या स्वागतासाठी रात्री १ वाजण्याच्या दरम्यान काही मुले रस्त्यावर उभी होती. यावेळी मोटारसायकलने गस्त घालणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने जमावबंदी लागू झाली झाल्याचे सांगून आपापल्या घरी जाण्यास बजावले. त्यानंतर ते पुढे गेले. गस्त घालणारे पोलीस अधिकारी पुन्हा त्याच रस्त्याने परत आल्यानंतर काही जणांनी पोलिसांकडे बघून शेरेबाजी केली. याचा राग येऊन पोलिसांनी तरुणांना मारहाण करून मध्यरात्री मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तरुणांनी नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी बाहेर आलो, तेव्हा मागून आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी विनाकारण बुलेट अंगावर घालून भररस्त्यात मारहाण केल्याचा आरोप केला. पोलीस अधिकारी नशेत असावे, असा संशय व्यक्त करून न्याय मिळण्याची मागणी केली आहे.
पोलीस उपायुक्त मोहिते यांनी हा प्रकार निंदनीय असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे तपास करून कारवाई करण्याचे संकेत दिले. जमावबंदी लागू असताना तरुण मध्यरात्री काय करीत होते, त्यांना घरी जाण्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगून उलट पोलिसाविरोधात शेरेबाजी करणे कितपत योग्य, असे प्रश्नही विचारले. ज्या रात्री मारहाण होऊन गुन्हा दाखल झाला, त्याच रात्री तरुणांनी व संबंधितांनी तक्रार का केली नाही, असेही मोहिते म्हणाले.