बंदुकीचा धाक दाखवून बांधकाम व्यावसायिकाच्या बंगल्यात टाकला दरोडा; कोटींचे दागिने लुटले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 07:27 PM2020-02-04T19:27:37+5:302020-02-04T19:30:04+5:30

उर्वरित पाच जणांचा शोध सुरुच; पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची माहिती

Dacoity in a builder's bungalow on the point of a pistol and looted jewelry worth crores | बंदुकीचा धाक दाखवून बांधकाम व्यावसायिकाच्या बंगल्यात टाकला दरोडा; कोटींचे दागिने लुटले

बंदुकीचा धाक दाखवून बांधकाम व्यावसायिकाच्या बंगल्यात टाकला दरोडा; कोटींचे दागिने लुटले

Next
ठळक मुद्देभिवंडीत दरोडा टाकणाऱ्या टोळीतील एक दरोडेखोर जेरबंद; एक कोटी २६ लाखांचे चार किलोचे सोने हस्तगतआणखी पाच जणांच्या शोधासाठी दोन वेगवेगळी पथके नियुक्त केल्याचेही त्यांनी सांगितले.

ठाणे - भिवंडीतील काल्हेर गावातील एका बांधकाम व्यावसायिकाकडे दरोडा टाकून एक कोटीे ८६ लाख ३० हजारांचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या सहा जणांच्या टोळीतील धर्मेश रणछोड वैष्णव (38, रा. ऐरोली, नवी मुंबई) याला सर्व सोन्याच्या दागिन्यांसह अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यातील आणखी पाच जणांच्या शोधासाठी दोन वेगवेगळी पथके नियुक्त केल्याचेही त्यांनी सांगितले.

भिवंडीतील काल्हेर गावातील बांधकाम तसेच वेअर हाऊसचे व्यावसायिक जगदीश पाटील हे ३० जानेवारी रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. ते बंगल्याबाहेर पडताच धर्मेश याच्यासह सहा जणांच्या टोळीपैकी चौघांनी अग्निशस्त्रांसह त्यांच्या बंगल्यात शिरकाव केला. त्यावेळी पाटील यांची पत्नी आणि मुलगी गाढ झोपेत होते. त्याचवेळी या टोळीने त्यांच्या बेडरुममध्ये शिरकाव करुन त्यांच्या पत्नीच्या डोक्याला बंदुकीचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी देत घरातील दोन महिला आणि एक पुरुष असा तिघांचे हातपाय रस्सीने हातपाय बांधले. त्यावेळी त्यांच्या मुलीने घरातील ४२१ तोळे सोने आणि सुमारे ६० लाखांची रोकड असा सुमारे एक कोटी ८६ लाख ३० हजार रुपये किंमतीचा ऐवज जबरीने लुटून पलायन केले होते. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात दरोडयासह आर्म अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल झाला होता.


ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता शोध पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप भानुशाली आणि मध्यवर्ती गुन्हे शोध पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव अशा दोघांच्या नेतृत्वाखाली आठ वेगवेगळया पथकांकडून या दरोडयाचा तपास करण्यात येत होता. तांत्रिक बाबी आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे यामध्ये धर्मेश वैष्णव या दरोडेखोराचे नाव समोर आले. सलग तीन दिवस आणि तीन रात्र मेहनत घेऊन मोठया कौशल्याने धर्मेशला एक बॅगेसह होनराव यांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीतील सर्वच्या सर्व म्हणजे चार किलो २१ ग्रॅम वजनाचे एक कोटी २६ लाख ३० हजारांचे सोन्याचे दागिने त्याच्याकडून हस्तगत करण्यात आले. त्याला दहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्याच्या आणखी पाच साथीदारांपैकी तिघे पंजाबमध्ये तर दोघे चेन्नईमध्ये पसार झाले असून त्यांचाही शोध घेण्यासाठी दोन वेगवेगळी पथके दोन्ही ठिकाणी रवाना झाली आहेत. पलायन केलेल्या आरोपींनी दरोडयातील रोकड नेल्याचेही धर्मेशने चौकशीत पोलिसांना सांगितले. दरोडयाच्या वेळी चौघांनी घरात शिरकाव केला होता. तर अन्य दोघे घराबाहेर पाळतीवर होते.



मध्यप्रदेशातील राजगडमध्येही दरोडा
धर्मेश हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याने याआधी मध्येप्रदेशातील राजगड येथेही २०१५ मध्ये दरोडा टाकला होता. या दरोडयामध्येही त्याने सराफाच्या दुकानातील सोन्याचे दागिने लुटले होते. याच गुन्हयामध्ये त्याला दहा वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. तो जामीनावर सुटल्यानंतर त्याने भिवंडीतील काल्हेरमध्ये काही साथीदारांच्या मदतीने पुन्हा दरोडा टाकल्याचे समोर आले आहे.

तपास पथकांना ५० हजारांचे बक्षिस
पोलीस निरीक्षक प्रदीप भानुशाली आणि अनिल होनराव या दोघांच्या पथकांनी अत्यंत मेहनतीने अवघड असलेल्या या दरोडयाचा मोठया कौशल्याने तपास केल्याचे सांगत दोन्ही पथकांसाठी प्रत्येकी २५ हजारांचे असे ५० हजारांचे बक्षिस पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी यावेळी जाहीर केले.

Web Title: Dacoity in a builder's bungalow on the point of a pistol and looted jewelry worth crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.