दाऊदचा पुतण्याही अखेर पाकमध्ये; अमेरिकेतून परत आणण्याचे मुंबई पोलिसांचे प्रयत्न निष्फळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 08:00 AM2022-01-14T08:00:49+5:302022-01-14T08:01:30+5:30
सोहेल व त्याचा साथीदार दानिश अलीला अमेरिकन सुरक्षा यंत्रणांनी २०१४ मध्ये नार्को टेररिझम प्रकरणात अटक केली.
मुंबई : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा पुतण्या सोहेल कासकरला भारतात परत आणण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. सोहेलला अमेरिकन सुरक्षा यंत्रणांनी मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यास नकार दिल्याने, त्याला दुबईमार्गे पाकमध्ये पलायन करणे शक्य झाले. तपास यंत्रणांशी योग्य समन्वयाअभावी या मोहिमेत अपयश आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. याबाबत मुंबई पोलिसांनी मात्र भाष्य करण्यास नकार दिला.
सोहेल व त्याचा साथीदार दानिश अलीला अमेरिकन सुरक्षा यंत्रणांनी २०१४ मध्ये नार्को टेररिझम प्रकरणात अटक केली. १२ सप्टेंबर २०१८ रोजी अमेरिकेच्या फेडरल कोर्टाने सोहेल कासकरला शिक्षा सुनावली होती. दानिशप्रमाणेच त्याला भारतात आणण्यासाठी मुंबई पोलीस प्रयत्नशील होते.
सोहेलकडे भारतीय पासपोर्ट मिळाल्याने त्याचा ताबा मिळविण्याचे प्रयत्न सुरू होते. सोहेल हा दाऊदचा भाऊ नूरा कासकरचा मुलगा आहे. नूराचा २०१० मध्ये पाकिस्तानमध्ये मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे मृत्यू झाला.२०१४ मध्ये अमेरिकन एजन्सींनी सोहेल, दानिश या दोघांना हेरॉईन (ड्रग्ज) आणि क्षेपणास्त्र व्यवहार प्रकरणात अटक केली. त्यानंतर हे प्रकरण तपासासाठी फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनकडे सोपविले होते.
समन्वयाअभावी मोहिम अपयशी
सोहेल कासकर याला मुंबईत आणण्यासाठी मुंबई पोलिसांसोबत केंद्राच्या अखत्यारितील अन्य तपासयंत्रणाही प्रयत्न करीत होत्या. राज्यापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर यासाठी मोहिम आखण्यात आली होती. मात्र या वेगवेगळ्या यंत्रणांमधील विसंवादाने मोहिमेला अपेक्षित यश मिळू शकले नसल्याचे सांगण्यात येते.