भाऊबीजेच्या दिवशी बहिण-भावाने घेतला टोकाचा निर्णय, जीवन संपवण्यासाठी प्यायले विष
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2020 05:34 PM2020-11-17T17:34:28+5:302020-11-17T17:36:53+5:30
Suicide Attempt : भोलाणे येथील घटना : बहिणीचा मृत्यू; भावाची प्रकृती चिंताजनक
जळगाव : आई वडीलांसोबत झालेल्या कौटुंबिक वादातून बहीण व भावाने विषप्राशन करुन जीवन संपविण्याचा प्रयत्न केल्याची घटना भाऊबीजेच्या दिवशी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास भादली, ता. जळगाव येथे घडली. या घटनेत बहिण अश्विता विजय कोळी (वय १९) हिचारुग्णालयात हलवित असतांना वाटेतच मृत्यू झाला तर भाऊ विश्वजीत विजय कोळी (वय २१) याच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत तालुका पोलिस स्टेशनला बहिणीच्या मृत्यूबद्दल अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भोलाणे येथील विजय कोळी हे एसटी महामंडळातून वाहक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. ते मुंबई येथे नोकरीत होते. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी असून ते तीनही मुले शिक्षणासाठी उल्हासनगर येथे होते. त्यात विश्वजीत विजय कोळी हा आर्किटेक्टचे शिक्षण घेत होता तर त्याचा मोठा भाऊ देवेश कोळी (वय २३), लहान बहीण अश्विता त्याच्या सोबत राहत होती. कोरोनामुळे टाळेबंदी सुरु झाली आणि त्यानंतर तिघेही भाऊ उल्हासनगर येथून घरी भोलाणे येथे आले होते.
सोमवारी १६ नोव्हेंबर रोजी पाडव्याचा आणि भाऊबीजेचा दिवस होता. याच दिवशी विश्वजितला अभ्यासाचं नैराश्य आलं. अभ्यासात मन लागत नाही म्हणून तो निराश झाला होता. तसेच आई वडीलांसोबत त्याचा याच कारणावरुन वाद झाला. वाद झाल्यानंतर त्याने घरातील शेतात फवारणीसाठी वापरल्या जाणारे औषध प्राशन केले. त्याच दरम्यान दहा मिनिटांच्या अंतरानंतर त्याची लहान बहीण अश्विता हिने देखील घराच्या बाहेर जाऊन विषप्राशन केले. हा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात आल्यावर दोघांना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र अश्विता हिचा वाटेतच मृत्यू झाला. रात्री पावणे दहा वाजता देवकर रुग्णालयात तिला डॉक्टरांनी मृत घोषीत केले. विश्वजीत याला शहरातील अॅपेक्स या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
बहिणीच्या मृत्यूची माहिती कळविलीच नाही
उपचार घेत असलेल्या विश्वजीत याला अद्यापही बहिणीच्या मृत्यूबद्दल कुटुंबियांकडून सांगण्यात आलेले नाही. घटनेची माहिती मिळाल्यावर तालुका पोलिसांनी रुग्णालयात जावून विश्वजीतचा जबाब नोंदविला. यात विश्वजीतने अभ्यासाच्या नैराश्यातून कृत्य करण्याचा प्रयत्न केला असे म्हटले आहे. मात्र त्याच्या बहिणीने विषप्राशन का केले याचे कारण कळू शकलेले नाही. मयत अश्विता हिच्यावर शवविच्छेदन करुन तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात असून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. भाऊबीजेच्या या घटनेमुळे भोलाणेसह जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अश्विता हिच्या मृत्यूप्रकरणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. अजय भोळे यांच्या खबरीवरुन तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेडकॉन्स्टेबल साहेबराव पाटील करीत आहेत.