Daya Nayak : दया नायक यांची सात वर्षात विदर्भात दुसऱ्यांदा बदली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 09:45 PM2021-05-06T21:45:34+5:302021-05-06T21:46:49+5:30
Daya Nayak : यापूर्वी रुजू होण्यास स्पष्ट नकार : आताही शंका-कुशंका
नरेश डोंगरे
नागपूर : गुन्हेगारांचा कर्दनकाळ आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले पोलीस निरीक्षक दया नायक यांची सात वर्षात विदर्भात झालेली ही दुसरी बदली होय. यापूर्वी त्यांनी नागपुरात रुजू होण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे आता ते जात पडताळणी प्रमाणपत्र तपासण्यासाठी गोंदियात रुजू होणार का, असा प्रश्न चर्चेला आला आहे.
'नाम ही काफी है', अशी स्वतःची प्रतिमा तयार करणारे दया नायक
१९८५ ला मुंबई पोलीस दलात रुजू झाले होते. अंडरवर्ल्डमधील अनेक कुख्यात गुंडांचा एकापाठोपाठ एनकाउंटर करून नायक यांनी प्रचंड दरारा निर्माण केला होता. यानंतर राज्यातील काही नेते तसेच पोलिस दलातील शीर्षस्थ अधिकाऱ्यांचे लाडके म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. सर्वसामान्य नागरिक आणि पोलीस दलच नव्हे तर बॉलीवूडलाही दया नायक या नावाने भुरळ घातली होती. या पार्श्वभूमीवर, २००६ मध्ये
कर्नाटक येथे नायक यांनी त्यांच्या आईच्या नावे बांधलेल्या शाळेचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी उद्घाटन केले आणि तेथून नायक यांचे वासे फिरले. नायक यांच्या बेहिशेबी मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी, अटकेची कारवाई झाली. त्यानंतर मुंबई पोलीस सेवेतून त्यांना निलंबित करण्यात आले.
२०१२ मध्ये त्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यात आले आणि जानेवारी २०१४ मध्ये त्यांची नागपूर परिक्षेत्रात बदली करण्यात आली. त्यावेळी नागपुरात रुजू होण्यास नायक यांनी स्पष्ट नकार दिला होता. त्यांचे हे वर्तन त्यावेळी त्यांना अडचणीत आणनारे ठरले आणि २०१५ मध्ये त्यांना पुन्हा निलंबित करण्यात आले. मात्र, वर्षभरात ते पुन्हा मुंबईत झाले. सध्या मुंबई एटीएस मध्ये ते सेवारत होते. आज त्यांची गोंदियाला बदली झाल्याचा आदेश निघाला. त्यामुळे राज्य पोलीस दलात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. दया नायक गोंदियात रुजू होतील का, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
कसे रमणार जात पडताळणीत ?
'घोड्या'चे अचूक तंत्र अवगत असणारे आणि भल्याभल्या गुंडांना कंठस्नान घालणारे दया नायक जात प्रमाणपत्र पडताळणीत कसे रमतील, असा प्रश्न या बदलीच्या निमित्ताने उपस्थित झाला आहे. मुंबई, नागपूरसह ठिकठिकाणच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दया नायक गोंदियात रुजू होणार नाही, असे आपले नाव न छापण्याच्या अटीवर ठामपणे सांगितले आहे. तर ते येथे रुजू होणे म्हणजे, चमत्कार ठरेल, असेही काहींनी म्हटले आहे.