आणखी एक बलात्कार आणि हत्या ? चापानेर शिवारात संशयास्पद अवस्थेत युवतीचा मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 01:43 PM2019-11-30T13:43:53+5:302019-11-30T14:09:53+5:30
तरुणीवर बलात्कार करून हत्येच्या संशय आहे.
कन्नड : तालुक्यातील आठेगाव येथील १८ वर्षीय तरुणीचा मृतदेह चापानेर शिवारात शुक्रवारी रात्री आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी रविराव रामलाल राव (२३, रा. खलीलाबाद, संत कबीरनगर, उत्तरप्रदेश ह. मु. चापानेर ता.कन्नड ) यास संशयावरून ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर तरुणीवर बलात्कार करून हत्येच्या संशय आहे. तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच बलात्कार आणि हत्या यावर प्रकाश पडेल असे मत पोलिसांनी व्यक्त केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी रात्री आठ वाजले तरी सदर तरुणी घरी न आल्याने तिच्या आई वडील व नातेवाईकांनी शोधशोध सुरु केली. मात्र, तरुणी सापडली नाही. तरुणीच्या पालकांना रविराव यांच्यावर संशय आला. त्यास विचारपूस केली असता त्याने, मला काहीच माहिती नसल्याचे सांगितले. यामुळे पालकांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार ग्रामीण पोलिसात दिली. यानंतर पोलिसांनी संशयित रविराव यास ताब्यात घेवून विचारपुस केली. मात्र त्याने तोंड उघडले नाही.
दरम्यान, पोलिसांनी तरुणीची शोध मोहीम सुरु केली. रात्री ११.३० वाजता पोलीस निरीक्षक सुनील नेवसे, उपनिरीक्षक बजरंग कुटुंबरे ,बीट जमादार मनोज घोडके यांनी आठेगाव ते चापानेर परिसर पिंजुन काढला. यावेळी चापानेर शिवारात तरुणीचा मृतदेह आढळून आला. रात्रीच तरुणीचे प्रेत शवविच्छेदनासाठी कन्नडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर युवतीच्या छातीचा एक वॉल निकामी असल्याने तिची प्रकृती नाजुक असल्याने तिचा नैसर्गिक मृत्यु झाला की खुन करण्यात आला याचा उलगडा होणे आवश्यक असल्याने शवविच्छेदनासाठी प्रेत घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले.
संशयिताचे तरुणीच्या घरी होते जाणेयेणे
संशयित आरोपी रविराव हा गेल्या सात ते आठ वर्षापासून चापानेर परिसरात घरातील फरशी बसविण्याचे मिस्त्री काम करतो. यातून त्याची तरुणीच्या वडिलांशी ओळख झाली व त्यांच्या घरी येणेजाणे वाढले. सदर घटनेने परिसरात खळबळ उडाली असून बलात्कार की खून अशा चर्चेला उधाण आले आहे. तरुणीची प्रकृती नाजुक होती तरुणीचा खून की बलात्कार हे शवविच्छेदन झाल्या नंतरच स्पष्ट होणार आहे.