अमरावती - परतवाडा शहरातील प्रख्यात डॉक्टर विजय वर्मा यांच्यावर घराशेजारील आखरे नामक इसमाने, शुक्रवारी सकाळी १०.४५ वाजाताच्या दरम्यान रॉडने प्राणघातक हल्ला केला. यात डॉक्टरांचे दोन्ही पाय निकामी झाले. पायांवर शस्त्रक्रिया व उपचारार्थ त्यांना नागपूरला हलविण्यात आले आहे.प्राप्त माहितीनुसार, राहुल आखरे (३०, रा. पट्टलवार लाईन व डॉ. विजय वर्मा यांच्यात गाडी पार्किंगसाठीच्या घराजवळील खुल्या जागेवरून वाद होता. यात त्यांचे खटके उडायचे. यापूर्वी अशातच मे २०२० मध्ये डॉक्टरांच्या पत्नीसोबतही वाद झाला. या घटनेचा डॉक्टरांच्या पत्नीने पोलिसांकडे तक्रारही दिली होती.दरम्यान शुक्रवारी राहुल आखरे आणि डॉ. विजय वर्मा यांच्यात वाद झाला. याचे पर्यावसान भांडणात होऊन राहुलने लाकडी काठीने डॉक्टराच्या डोक्यावर, तर लोखंडी रॉडने दोन्ही पायांवर वार केले. जखमी अवस्थेत डॉक्टरला परतवाडा येथील डॉ. तपन रावत यांच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून पुढे त्यांना नागपुरला हलविण्यात आले. घटनेची माहिती शहरात पसरताच भेटणाऱ्यांनी व बघणाऱ्यांनी दवाखान्यापुढे एकच गर्दी केली. या घटनेचा वैद्यकीय क्षेत्रात सर्वत्र निषेध केला जात आहे.
डॉक्टरांचा मुलगा अमित वर्मा (३८) रा. पट्टलवार लाईन याने दिलेल्या फिर्यादीवरुन परतवाडा पोलिसांनी आरोपी राहुल आखरे व दादाराव आखरे यांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध भादंवि ३०७, ३५४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान राज्यमंत्री बच्चू कडू आणि खासदार नवनीत राणा यांनीही या घटनेची दखल घेतली असून दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनास दिले आहेत. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सदानंद मानकर यांच्या मार्गदर्शनात परतवाडा पोलीस करीत आहेत.