नागपुरात घातक शस्त्रांचा साठा जप्त : शस्त्र तस्कराला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 10:55 PM2020-02-08T22:55:12+5:302020-02-08T22:57:41+5:30
घातक शस्त्रांची विविध प्रांतात तस्करी करणाऱ्या हरियाणातील एका तस्कराला गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून चाकू, चॉपर अन् गुप्तीसारख्या घातक शस्त्रांचे घबाड पोलिसांनी जप्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घातक शस्त्रांची विविध प्रांतात तस्करी करणाऱ्या हरियाणातील एका तस्कराला गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून चाकू, चॉपर अन् गुप्तीसारख्या घातक शस्त्रांचे घबाड पोलिसांनी जप्त केले. सुरजितसिंग गुरचरणसिंग (वय ४७) असे आरोपीचे नाव आहे. तो हरियाणातील करनाल जिल्ह्यातील असंध गावचा मूळनिवासी आहे.
आरोपी सुरजितसिंग सध्या पाचपावलीतील बाबा बुद्धाजीनगरात गुरुद्वाराजवळ राहतो. तो घातक शस्त्रांची तस्करी आणि विक्री करतो, अशी माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यावरून युनिट पाचच्या पथकाने त्याच्या घरी शनिवारी सायंकाळी ५ च्या सुमारास छापा घातला. यावेळी पोलिसांना घातक शस्त्रांचा मोठा साठा आढळला. पोलिसांनी त्याच्याकडून १ मोेठे चॉपर, सात चाकू, पाच गुप्त्या आणि दोन फायटर जप्त केले. प्राथमिक चौकशीनंतर आरोपी सुरजितसिंगविरुद्ध पाचपावली ठाण्यात शस्त्र प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, उपायुक्त गजानन राजमाने, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार, किशोर जाधव, वरिष्ठ निरीक्षक विनोद पाटील, सहायक निरीक्षक अनिल मेश्राम, हवालदार उमेश खोब्रागडे, तुलसी शुक्ला, सुनील ठवकर, दिनेश चाफलेकर, अनिल बावणे, उत्कर्ष राऊत, फराज खान यांनी ही कामगिरी बजावली.