आकाशपाळण्यातून पडून मुलीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 02:26 PM2019-06-07T14:26:59+5:302019-06-07T14:34:25+5:30
ईदच्या दिवशीच घडली दुर्घटना; कुटुंबावर शोककळा
भिवंडी - रमजान ईदनिमित्त शहरातील समदनगरमध्ये भरलेल्या खेळण्यांच्या जत्रेत आकाशपाळण्यातून पडून नऊ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. ऐन ईदच्या दिवशी ही घटना घडल्याने मुलीच्या कुटुंबासह परिसरावर शोककळा पसरली.
मुस्कान मोहम्मद शमीम सिद्दीकी (वय ९) हे मृत मुलीचे नाव असून ती कापतलाव जैतुनपुरा या भागात आईवडिलांसोबत राहत होती. बुधवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास मुस्कान आपल्या चुलत बहिणीसोबत समदनगर येथील खेळण्यांच्या जत्रेत गेली. तेथे हाताने फिरवल्या जाणाऱ्या छोट्या आकाशपाळण्यात ती बसली. पाळणा फिरताना वर गेल्यानंतर जीव घाबरून तिचा तोल गेला. ती खाली पडत असताना पाळण्याच्या खांबावर आदळून तिच्या डोक्याला जबरदस्त मार लागला. त्यामुळे रक्ताच्या थारोळ्यात ती पडली. ही घटना घडल्यानंतर पाळणा चालवणाऱ्या चालकाने तेथून पलायन केले.
मुस्कानच्या कुटुंबीयांनी जखमी मुस्कानला स्व. इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आकाशपाळणा फिरवणाऱ्या चालकाने तत्काळ मुलीला वैद्यकीय मदत दिली असती, तर ती बचावली असती. पाळणाचालकाच्या हलगर्जीपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप मुस्कानचे वडील मोहम्मद शमीम सिद्दीकी यांनी केला आहे.
गुन्हा दाखल करणार
मुस्कानच्या दुर्दैवी मृत्यूबाबत शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कसून चौकशी करत असून तपासाअंती पाळणाचालकावर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास कोकाटे यांनी दिली.