पुणे : ससून रुग्णालयात कैद्याच्या बंदोबस्ताची ड्युटी लावल्याच्या कारणावरुन कारागृहातील एका कर्मचार्याने थेट वरिष्ठ अधिकार्याच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी कारागृह कर्मचार्याविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयकुमार सोमनाथ शिंदे (वय ३९, रा.शासकीय कर्मचारी निवासस्थान, येरवडा) असे त्याचे नाव आहे़ याप्रकरणी चंद्रमणी अर्जुनची इंदुरकर (वय ५५, रा. शासकीय वसाहत, येरवडा) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना सोमवारी दुपारी पावणेदोन वाजता घडली.चंद्रमणी हे येरवडा येथील तात्पुरत्या कारागृहात उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कारागृहातील आरोपी प्रकाश फाले याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर देखरेख करण्यासाठी कारागृहातील कर्मचारी जयकुमार शिंदे याला ससून रुग्णालयात रात्रपाळी ड्युटी ला जाण्याचा लेखी आदेश चंद्रमणी यांनी दिला होता. त्याचा राग आल्यावर जयकुमार याने चंद्रमणी यांना दररोज मला ससून रुग्णालयात जाण्यास सांगतोय, तुझा आदेश असला तरी मी ससून रुग्णालयात जाणार नाही, असे सांगितले. त्यानंतर लेखी आदेश चंद्रमणी यांच्या अंगावर भिरकवला. त्यावर चंद्रमणी यांनी वरिष्ठांची बोलण्याची ही पद्धत आहे का अशी विचारणा केली. त्यामुळे जयकुमार याने रागाच्या भरात त्यांच्या हातातील पेन हिसकावून घेत़ मी ससून रुग्णालयात ड्युटीला जाणार नाही. मला एक वर्षाचा मुलगा आहे. जर त्याला काही कमी जास्त झाले तर मी तुझ्या खानदानाला मारुन टाकीन, अशी धमकी दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे अधिक तपास करीत आहेत.
येरवडा कारागृह उपअधीक्षकाच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी; कर्मचार्याविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2020 5:30 PM