मुंबई - गाडीला वाट न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून घाटकोपरमध्ये तरुणाची काल मध्यरात्री हत्या करण्यात आली. गणेश म्हस्के (२२) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी चार अनोळखी व्यक्तींविरोधात खुनाचा गुन्हा घाटकोपर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून त्यांचा शोधासाठी पोलिसांचे पथक दापोली येथे रवाना झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घाटकोपर (प.), साईनाथ नगर येथील रहिवासी असलेल्या गणेश म्हस्के काल मध्यरात्री परिसरातील एका रस्त्याच्या कडेला दुचाकी घेऊन उभा होता. त्यादरम्यान कारमधून चार जण तेथे आले आणि त्यांनी गणेशला दुचाकी बाजूला घेण्यास सांगितली. यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. बाचाबाचीनंतर चौघांनी गणेशला जबर मारहाण करत बाजूच्या नाल्यात ढकलून दिले. या घटनेनंतर चारही आरोपी कार सोडून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तरूणाला गटाराबाहेर काढले. उपचारासाठी त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळावरील दोन्ही गाड्या जप्त केल्या असून आरोपींचा शोध सुरू केला आहे.एमेच ४६, यू - ०३०३ असा चारचाकीचा क्रमांक असून ही इनोव्हा कार जोगेश्वरी येथून आणली होती. चार आरोपींमध्ये एका निलंबित पोलीसाचा देखील सहभाग असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. हत्येचा कट हा निलंबित पोलिसानेच मित्रांसह आखल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
खळबळजनक! घाटकोपरमध्ये तरूणाची हत्या; निलंबित पोलिसांचा कट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 9:40 PM
खुनाचा गुन्हा घाटकोपर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला
ठळक मुद्देगणेश म्हस्के (२२) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी चार अनोळखी व्यक्तींविरोधात खुनाचा गुन्हा घाटकोपर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला हत्येचा कट हा निलंबित पोलिसानेच मित्रांसह आखल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.