नवी दिल्ली: वाद सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेला मारहाण झाल्याचा आणि कारसोबत फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार आग्नेय दिल्लीत घडला आहे. दोन चालकांमधील भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या महिलेला कारमध्ये बसलेल्या तरुणांनी कानशिलात लगावली. या प्रकरणातील एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. तर दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी पीडित महिलेनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. रस्त्यावर वाद झाला. त्यानंतर कारमध्ये असलेल्या तरुणांनी रस्ता रोखून धरला. यावेळी महिला कॅबमधून प्रवास करत होती. महिलेनं कारमधील तरुणांना समजवण्याचा, भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र तू तुझं काम कर, असं उत्तर तरुणांनी महिलेला दिलं.
तरुण उलट उत्तर देत असल्याचं पाहून महिलेनं एकाच्या कानशिलात लगावली. यानंतर तरुणांनी शिवीगाळ सुरू केली. त्यांनी अनेकदा तिच्या श्रीमुखात भडकावली. महिलेनं कार थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तरुणांनी तिला कारसोबत काही मीटर अंतर फरफटवत नेलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महिला कारसोबत फरफटवण्यात आल्याचं यात दिसत आहे.
या प्रकरणी पोलिसांनी कलम ३४, ३२३ आणि ५०९ च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एका आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे. महिलेच्या तक्रारीकडे आधी पोलिसांनी दुर्लक्ष केलं. त्याप्रकरणी तीन पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे.