४६ हजारांच्या आयफोनसाठी डिलिव्हरी बॉयची हत्या! तीन दिवस घरातच ठेवला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 11:04 AM2023-02-21T11:04:27+5:302023-02-21T11:04:40+5:30
आरोपी हेमंत दत्ता याला मोबाइल घ्यायचा होता, मात्र त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यासाठी त्याने एक कट रचला.
बंगळुरू - केवळ ४६ हजारांच्या आयफोनसाठी डिलिव्हरी बॉयची हत्या केल्याची घटना कर्नाटकातील हसन येथे उघडकीस आली आहे. मोबाइल घेण्यासाठी पैसे नसल्याने २० वर्षीय तरुणाने ही हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीने डिलिव्हरी बॉयचा मृतदेह तीन दिवस घरात ठेवला आणि त्यानंतर मृतदेह स्कूटीवरून नेत जाळण्याचा प्रयत्न केला.
आरोपी हेमंत दत्ता याला मोबाइल घ्यायचा होता, मात्र त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यासाठी त्याने एक कट रचला. त्याने प्रथम फ्लिपकार्टवरून आयफोन ऑर्डर केला. ७ फेब्रुवारी रोजी २३ वर्षीय डिलिव्हरी बॉय मोबाइल देण्यासाठी आरोपीच्या घरी पोहोचला तेव्हा आरोपीने त्याला थांबण्यास सांगितले. काही वेळाने हेमंतने त्याला बहाण्याने आत बोलावून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ११ फेब्रुवारी रोजी अर्सिकेरे शहरातील अंककोप्पल रेल्वे स्थानकाजवळून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला होता.
सीसीटीव्ही फुटेजने फोडले बिंग
हत्येनंतर तीन दिवसांनी मृताचा भाऊ मंजू नाईक याने पोलिस ठाण्यात हेमंत नाईक बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला अटक केली. दोन दिवसांपूर्वी आरोपी पेट्रोल पंपावरून बाटलीत पेट्रोल खरेदी करताना दिसला होता.