उस्मानाबाद / भूम : भूम येथील उपविभागीय अधिकारी मनिषा राशीनकर यांच्यावर मंगळवारी रात्री लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे. वाळू वाहतुकीसाठी १ लाख १० हजार रुपयांची लाच मागून त्याचा पहिला हप्ता कोतवालाकरवी स्विकारण्यात आला आहे. परंडातालुक्यातील एका तक्रारदाराने यासंदर्भात लाचलुचपतकडे तक्रार केली होती.
तक्रारदार हा वाळूची वाहतूक करतो. ती सुरळीत चालू देण्यासाठी उपविभागीय अधिकारी मनिषा राशीनकर यांनी कोतवाल जानकर याच्याकरवी तक्रारदाराकडे १ लाख १० हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ९० हजार रुपये ठरविण्यात आले. मात्र, तक्रारदाराने लाचेची रक्कम देण्यापूर्वीच लाचलुचपत विभागास संपर्क साधला. उपाधीक्षक प्रशांत संपते यांनी या तक्रारीची खात्री केल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्या सूचनेनुसार मंगळवारी रात्री भूम येथे नियोजनाप्रमाणे सापळा रचण्यात आला.
यावेळी तक्रारदाराने पहिला हप्ता म्हणून २० हजार रुपये कोतवाल विलास जानकर याच्याकडे देऊ केले. यानंतर लागलीच लाचलुचपतच्या पथकाने त्यास लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले. याप्रकरणी भूम ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु रात्री उशिरापर्यंत सुरु होती. दरम्यान, आता पुढील कार्यवाही ही उद्याच होईल, असे लाचलुचपतच्या सूत्रांनी सांगितले.