लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : मनसेचे ठाणे, पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पालघर जिल्हा, ठाणे ग्रामीण, ठाणे, नवी मुंबई, मुंबई तसेच रायगड जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याची नोटीस शुक्रवारी बजावण्यात आली. यासंदर्भात प्रस्ताव सादर झालेला असून जाधव यांना त्यांची बाजू मांडण्याकरिता ४ आॅगस्ट रोजी विरार येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयात हजर राहण्यास सूचित करण्यात आले आहे.
विरार उपविभागीय अधिकारी रेणुका बागडे यांनी शुक्रवारी याबाबतची नोटीस बजावली.वालीव येथील कोविड रुग्णालयात रुग्णांचे हाल होत असल्याने वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त गंगाथरन डी. यांच्या दालनाबाहेर काही दिवसांपूर्वी जाधव यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत राडा केला होता. याप्रकरणी विरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.दरम्यान, ठाणे महापालिकेत शुक्रवारी आंदोलन केल्याप्रकरणी जाधव यांच्यावर नौपाडा पोलीस ठाण्यात भादंवि कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात आली. त्यानंतर त्यांना खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी त्यांची चार तास चौकशी करुन लेखी जबाब घेतला.ठाणे महानगरपालिकेच्या आपत्कालीन सेवेतील काही कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरून कमी केल्याबद्दल आणि पालिकेच्या कोविड सेंटरमध्ये महिलेसोबत झालेल्या गैरप्रकाराचा जाब विचारण्यासाठी जाधव हे ठाणे पालिकेत गेले होते.
याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. त्यानंतर कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी खंडणी विरोधी पथकाने त्यांना ताब्यात घेतले.जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त पसरताच मनसैनिकांनी गर्दी केली होती. अशा कोणत्याही दबावाला बळी न पडता सर्वसामान्यांच्या न्यायासाठी आपण संघर्ष करतच राहू, असे अविनाश जाधव यांनी यावेळी वृत्तवाहिन्यांना सांगितले.